मुंबई : प्रतिनिधी
बॉलिवूडची ‘रंगीला गर्ल’ ऊर्मिला मातोंडकर हिने लग्नाच्या आठ वर्षांनंतर पती मोहसीन अख्तर मीर याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ऊर्मिलाने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. मुंबईतील एका न्यायालयाच्या सूत्रानुसार, ऊर्मिलाने चार महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, काळजीपूर्वक विचार केल्यानंतर ऊर्मिलाने मोहसीनसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिने न्यायालयात याआधीच घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पण त्यांचे वेगळे होण्यामागील कारण अद्याप कळू शकलेले नाही. पण त्यांचा वेगळे होण्याचा निर्णय परस्पर सहमतीने झालेला नाही.
ऊर्मिला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री असून मोहसीन हा एक काश्मिरी उद्योजक आणि मॉडेल आहे. दोघांनी ४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका साध्या सोहळ्यात लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नावेळी केवळ त्यांचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. दोघांची भेट बॉलिवूड डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या भाचीच्या लग्नात झाली होती. दोघांच्या वयात १० वर्षांचे अंतर आहे. ऊर्मिला मातोंडकरने वयाच्या ४२ व्या वर्षी मोहसीन अख्तरसोबत लग्न केले होते. मोहसीन ऊर्मिलापेक्षा १० वर्षांनी लहान आहे.
ऊर्मिलाचा बॉलिवूड ते राजकारण प्रवास
ऊर्मिलाने १ डिसेंबर २०२० रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी तिने २०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. त्यात ऊर्मिलाचा पराभव झाला होता. १९९० तसेच २००० नंतरच्या दशकात रंगीला, जुदाई, भूत, जंगल या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिने काही दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ऊर्मिलाने ‘आजोबा’ या मराठी चित्रपटातही काम केले होते.