तेल अवीव/तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या शस्त्रसंधी वाटाघाटीदरम्यान, अमेरिकेच्या सैन्याने होर्मुज सामुद्रधुनीजवळ इराणी क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळे आणि सुरुंग पेरणा-या बोटींना लक्ष्य केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार, ही कारवाई सेल्फ-डिफेन्स म्हणजेच आत्मसंरक्षणासाठी करण्यात आली. सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स म्हणाले की, अमेरिकन सैनिक आणि युद्धनौकांना धोक्यापासून वाचवण्यासाठी हे हल्ले करण्यात आले. तथापि, त्यांनी असेही सांगितले की, शस्त्रसंधीदरम्यान अमेरिका संयम बाळगत आहे.
होर्मुज सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी व्यापार मार्गांपैकी एक मानली जाते. याच मार्गातून मोठ्या प्रमाणात तेलाचा पुरवठा होतो. अमेरिकेच्या सैन्याचा आरोप आहे की, इराणी बोटी सागरी मार्गात सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करत होत्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय जहाजे आणि अमेरिकन युद्धनौकांना धोका निर्माण होऊ शकला असता. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, इराणचे युरेनियम एकतर अमेरिकेला सुपूर्द केले जाईल किंवा आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली नष्ट केले जाईल.
दिवसभरातील ५ मोठ्या घडामोडी
इराणसोबत ओबामांसारखा करार नाही
ट्रम्प म्हणाले की ते इराणसोबत ओबामांसारखा करार करणार नाहीत. त्यांनी सांगितले की, एकतर चांगला करार होईल किंवा काहीही होणार नाही.
इराणच्या दोहा चर्चेत युरेनियमचा मुद्दा
इराणच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या कतार दौ-यात होर्मुज सामुद्रधुनी आणि उच्च-समृद्ध युरेनियम हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. तसेच, इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता सोडण्यावरही चर्चा सुरू आहे.
अमेरिका-इराणमध्ये करारावर स्वाक्ष-या नाहीत
अमेरिका आणि इराण यांच्यात करारावर स्वाक्ष-या होऊ शकल्या नाहीत. यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, रविवारीच दोन्ही देश युद्धविराम वाढवण्यासाठी आणि होर्मुझ उघडण्यासाठी करार करू शकतात.
सुप्रीम लीडरच्या मंजुरीशिवाय कोणताही निर्णय नाही
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पजशकियान यांनी सांगितले की, इराणमध्ये कोणताही मोठा निर्णय सुप्रीम लीडरच्या मंजुरीशिवाय घेतला जाणार नाही.
इराणचा हिजबुल्लाहला पुन्हा पाठिंबा
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी लेबनॉन आणि हिजबुल्लाहच्या समर्थनार्थ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले की, इराण, इस्रायलविरुद्ध लेबनॉनच्या सार्वभौमत्वाच्या आणि प्रादेशिक अखंडतेच्या बाजूने उभा आहे.
















