नवी दिल्ली : एकीकडे रशिया-युक्रेन आणि दुसरीकडे इस्राईल-गाझा यांच्यातील युद्ध थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता अमेरिकेने इराक-सीरियामधील दहशतवाद्यांच्या तळावर बॉम्बहल्ला केला.
अमेरिकेने इराक-सीरियामध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात ८५ दहशतवादी छावण्या उध्वस्त केली आहेत. यामुळे जगाच्या पटलावर आणखी युद्ध पेटण्याची शक्यता यामुळे वर्तवण्यात येत आहे.
अमेरिकन सैन्याने शुक्रवारी इराक आणि सीरियामध्ये इराण समर्थित मिलिशिया आणि इराणी रिव्होल्युशनरी गार्डद्वारे अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले. जॉर्डनमध्ये तीन अमेरिकन सैनिक मारले गेले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा बॉम्बहल्ला करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युद्धाचा इशारा दिला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेला कोणताही संघर्ष करायचा नाही. परंतु आमचं नुकसान होत असेल तर आम्ही उत्तर देऊ. जर तुम्ही अमेरिकेला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहोत.
इराकी सार्वभौमत्वावर हल्ला
अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराकची प्रतिक्रिया आली आहे. इराक सशस्त्र दलाच्या कमांडर चीफच्या प्रवक्त्याने म्हटले की, हे हल्ले अशा वेळी झाले आहेत जेव्हा इराक या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अमेरिकेचे बॉम्बहल्ले इराकी सार्वभौमत्वावरचे हल्ले आहेत. इराक सरकारच्या शांततेच्या प्रयत्नांना कमकुवत करण्यासाठीचे हे प्रयत्न असून त्यामुळे वाईट परिणाम होऊ शकतात.