मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयातील दूषित पाण्याने अधिकारी-कर्मचा-यांचे आरोग्य बिघडले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चहापानासाठी अशुद्ध पाणी वापरले गेल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला. खुद्द मुख्यमंत्र्यांनी त्यांना देण्यात आलेल्या कॉफीला वास येत असल्याची तक्रार केली. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चहा, कॉफीसाठी बाटलीबंद मिनरल पाण्याचा वापर सुरू झाला आहे.
मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयात अनेक महत्वाच्या बैठका होतात. बैठकीच्या निमित्ताने येणारे मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, अति महत्वाच्या व्यक्तींचे चहापान देऊन आदरातिथ्य केले जाते. त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला लागून छोटी कॅन्टीन आहे. अशाच एका बैठकीसाठी मुख्यमंर्त्यांना कॉफी देण्यात आली. त्यावेळी कॉफीला वास येत असल्याची तक्रार फडणवीस यांनी केली. या तक्रारीनंतर मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिका-याने चहा झ्र कॉफी तयार करणा-या कर्मचा-यांची झाडाझडती घेतली.
मंत्रालयातील पाणी दूषित आणि जीवाणू मिश्रित असल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. या पाण्यामुळे मंत्रालयातील जवळपास ४० ते ५० टक्के अधिकारी कर्मचा-यांना जुलाब, ताप, उलटीचा त्रास सुरू झाला. काहींना तर दूषित पाण्याने काविळ झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या एका वरिष्ठ अधिका-याने खुद्द मुख्यमंर्त्यांना अशुद्ध पाण्याचा त्रास जाणवल्याची माहिती दिली.
मंत्रालयातील पाण्याचा धसका
दूषित पाण्याने त्रास झाल्याने अधिकारी – कर्मचा-यांनी मंत्रालयातील पाण्याचा चांगलाच धसका घेतला आहे. मंत्रालयातील पाणी पिण्याऐवजी अधिकारी-कर्मचा-यांनी आता स्वखर्चाने बाटलीबंद पाणी वापरण्यास सुरुवात केली आहे.
मुख्य सचिवांकडे तक्रार
दरम्यान, मंत्रालयातील दूषित पाणी पुरवठ्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे अधिकारी-कर्मचा-यांचे म्हणणे आहे. मंत्रालयातील दूषित पाण्याची समस्या अद्याप दूर झाली नसल्याने काही अधिकारी-कर्मचा-यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची भेट घेऊन बांधकाम विभागाबद्दल तक्रार केल्याचे समजते.
















