30.9 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्रपालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लास्टिक गजाचा वापर

पालखी महामार्गाच्या गटाराच्या कामात चक्क प्लास्टिक गजाचा वापर

काटेवाडी येथे प्रकार उघडकीस

बारामती/काटेवाडी/सणसर : येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामात मोठा गैरप्रकार समोर आला आहे. या गटारासाठी लोखंडी गज (सळई) वापरण्याऐवजी प्लास्टिकचे गज वापरण्यात येत असून त्यांना वरून काळा रंग देऊन त्यांचा बनावटी लोखंडी गज असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. काटेवाडी येथील नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, त्यांनी या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महामार्गाचे काम ठप्प असले तरी साईड गटारचे काम सुरू आहे. पूर्वीच्या टप्प्यात लोखंडी गजांचा वापर करण्यात आला होता, मात्र आता प्लास्टिकचे गज वापरण्यात येत आहेत. हे गज जरा जोरात दाबले किंवा दुमडले तर तुकडे होत असून त्यातून प्लास्टिकचा कचरा बाहेर येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प दर्जाहीन होत असून भविष्यात मोठा अपघात किंवा नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

याच महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणले आहे. पालखी महामार्गाचे काम सध्या ठप्प असून, जे काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे आरोपही ग्रामस्थांनी केले आहेत. पालखी महामार्गाच्या कडेच्या गटारावर काम दर्जाचे असल्याचे पूर्ण करण्याची आणि दर्जेदार कामाची मागणीही करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काटेवाडीतील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. शासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. गटाराच्या कामात प्लास्टिक गज वापरण्यास परवानगी आहे का, याबाबत देखील शासकीय नियमांबाबत संबंधितांनी खुलासा करण्याची मागणी होत आहे.

कामाची तपासणी करा
पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य अ‍ॅड. तुषार इंझेंडे पाटील म्हणाले की, प्लास्टीकचे गज वापरणे अत्यंत चुकीचे आहे. दक्षता व गुणवत्ता नियंत्रण विभाग महामार्गाच्या कामाचा दर्जा तपासतो. संबंधित विभागाने पालखी महामार्ग कामाच्या तपासणीची गरज आहे.

नागरिकांमध्ये भीतीयुक्त संभ्रम
सध्या प्लास्टिकचा वापर प्रत्येक ठिकाणी वाढला आहे. मात्र, काँक्रीटमध्ये प्लास्टिकच्या सळईचा वापर कितपत योग्य होईल? संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या गटार लाईनच्या कामांमध्ये लोखंडी सळईच्या ऐवजी प्लास्टिकची सळई वापरली जात असल्याने सणसर तसेच परिसरातील नागरिकांमध्ये भीतीयुक्त संभ्रम निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR