ढाका : काही महिन्यांपूर्वी सत्तांतर होऊन हंगमी सरकार सत्तेवर आल्यापासून बांगलादेशमध्येंिहदू अल्पसंख्याक आणि हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले होत आहेत. अनेक मंदिरांची मोडतोड होत असून, ंिहदूंवरही सातत्याने अत्याचार सुरू आहेत. आता बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
बांगलादेशमधील चट्टोग्राम येथे शुक्रवारी घोषणाबाजी करणा-या जमावाने तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य केले. इस्कॉनच्या एका माजी सदस्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर चट्टोग्राममध्ये आंदोलन सुरू आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला हरिशचंद्र मुनसेफ लेनमध्ये दुपारी सुमारे २.३० च्या दरम्यान झाला. यादरम्यान शांतानेश्वरी मातृ मंदिर, शनिमंदिर आणि शांतनेश्वरी कालिबाडी मंदिर या मंदिरांना लक्ष्य करण्यात आले.
याबाबत मंदिरातील विश्वस्तांनी सांगितले की, घोषबाजी करत असलेला शेकडोंचा जमाव मंदिरावर चाल करून आला. या जमावाने मंदिरावर दगड-विटांचा वर्षाव केला. त्यामध्ये शनी मंदिर आणि इतर दोन मंदिरांच्या दरवाजांचे नुकसान झाले. येथील पोलिस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी हल्ल्याच्या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, हल्लेखोरांनी मंदिरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. मात्र मंदिरांचे फारसे नुकसान झाले नसल्याचा दावा पोलिसांनी केला.
हल्लेखोरांना विरोध होत नाही
शांतिनेश्वरी मुख्य मंदिर व्यवस्थापन समितीचे स्थायी सदस्य तपन दास यांनी सांगितले की, शुक्रवारची नमाज झाल्यानंतर शेकडो लोकांचा जमाव मंदिराच्या दिशेने चाल करून आला. ते हिंदू विरोधी आणि इस्कॉनविरोधी घोषणाबाजी करू लागले. आम्ही हल्लेखोरांना विरोध केला नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा आम्ही लष्कराला बोलावले. ते त्वरित आले. तसेच त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मदत केली. दुपार होण्यापूर्वीच मंदिराचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. मात्र हल्लेखोर विनाकारण तिथे पोहोचले आणि हल्ला केला, असा दावाही त्यांनी केला.