27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयवंदे भारत देशात सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे!

वंदे भारत देशात सर्वाधिक अंतर कापणारी रेल्वे!

सणासुदीच्या काळात सोय, सणासुदीसाठी खास रेल्वे, विविध राज्यांत धावतात ३४ वंदे भारत ट्रेन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आताच्या घडीला देशात ३४ वंदे भारत ट्रेन विविध राज्यांत धावतात. यातच आता दिवाळीसह आगामी सणासुदीच्या काळात अन्य सेवांप्रमाणे भारतीय रेल्वेने फेस्टिव्हल स्पेशल वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सणासुदीच्या काळासाठी एक अशी वंदे भारत एक्स्प्रेस चालविली जात आहे. ती देशातील सर्वाधिक अंतर कापणारी ट्रेन ठरली आहे.

सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवत आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी देशाची राजधानी नवी दिल्ली ते बिहारची राजधानी पाटणापर्यंत वंदे भारत महोत्सव विशेष ट्रेन चालवत आहे. ही वंदे भारत एक्स्प्रेस नवी दिल्ली ते पाटणा जंक्शन दरम्यान धावते. नवी दिल्ली ते पाटणा यांमधील अंतर ९९४ कि.मी. असून, वंदे भारत एक्स्प्रेस हे अंतर केवळ १२ तासांत कापू शकते, असे सांगितले जात आहे. या विशेष वंदे भारत ट्रेनचे बुकिंगही सुरू झाले आहे.

नवी दिल्ली ते पाटणादरम्यान धावत असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस हा देशातील सर्वाधिक अंतर असलेला मार्ग आहे. यापूर्वी नवी दिल्ली-वाराणसीदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस सर्वाधिक अंतर असलेली ट्रेन होती. नवी दिल्ली ते वाराणसी हे ७७१ कि.मी.चे अंतर वंदे भारत एक्स्प्रेस ८ तासांत कापते. नवी दिल्ली-पाटणा वंदे भारत ट्रेनचा मार्ग यापेक्षा अधिक अंतराचा आहे. ही वंदे भारत ट्रेन विशेष उद्देशाने चालविण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस सध्या शताब्दी मार्गावर चालविल्या जात आहेत. या आर्थिक वर्षात स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची रेल्वेची योजना आहे.

दरम्यान, ही ट्रेन नवी दिल्लीहून सकाळी ७.२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता पाटणा येथे पोहोचेल. त्यानंतर दुस-या दिवशी सकाळी पाटणा जंक्शन येथून सकाळी ७.३० वाजता वंदे भारत ट्रेन सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता नवी दिल्लीला पोहोचेल. नवी दिल्ली ते पाटणा या एसी चेअर कार कोचचे भाडे २३५५ रुपये आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचे भाडे ४४१० रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. सणासुदीच्या काळात प्रचंड गर्दी होते. अशावेळी या गाडीमुळे प्रवाशांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR