बंगळूरू : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखताना नववा विजय मिळवला. वर्ल्ड कपमध्ये सलग ९ विजय मिळवणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय कर्णधार ठरला. सौरव गांगुलीने २००३ मध्ये सलग ८ मॅच जिंकल्या होत्या. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे शतक व विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने चारशेपार धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजांनी नेदरलँड्सचा डाव गुंडाळला आणि भारताला १६० धावांनी विजय मिळवून दिला.
आता १५ नोव्हेंबरला भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध उपांत्य फेरीच्या लढतीसाठी मैदानावर उतरेल. या सामन्यात विराट, शुबमन आणि सूर्यकुमार यादव यांनीही गोलंदाजी केली. विराटने ९ वर्षानंतर विकेट मिळवली. मोहम्मद सिराजने दुस-याच षटकात सलामीवीर वेस्ली बार्रेसीला ( ४) बाद केले. मॅक्स ओ’डोड ( ३०) आणि कॉलिन एकरमन ( ३५) यांनी संघर्षमय ६१ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी या सेट फलंदाजांना माघारी पाठवले. विराट कोहलीला गोलंदाजी द्या… ही चाहत्यांची दीर्घकालीन मागणी रोहितने आज मान्य केली आणि विराटने त्याच्या दुस-या षटकात विकेट मिळवून दिली. नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड ( १७) वाईड जाणारा चेंडू छेडायला गेला अन् लोकेशने सुरेख झेल घेतला.
२०१४ मध्ये विराटने शेवटची विकेट घेतली होती आणि ९ वर्षानंतर त्याने विकेट घेतली. विराटने विकेट घेताच स्टेडियम दणाणून गेलेच, परंतु त्याची पत्नी अनुष्कानेही जोरदार सेलिब्रेशन केले. रोहितने आता चेंडू शुबमनच्या हाती दिला अन् त्याच्याकडूनही षटक फेकून घेतले. दुस-याबाजूने जसप्रीत बुमराहचा मारा सुरू केला आणि त्याने बॅस डे लीडचा ( १२) त्रिफळा उडवला. सूर्यकुमार यादवही गोलंदाजीला आला आणि आता रोहितने स्वत: गोलंदाजी करावी अशी मागणी होताना दिसली. सिराज पुन्हा मैदानावर आल्याने टीम इंडियाला दिलासा मिळाला. त्याने नेदरलँड्सचा सेट पलंदाज सायब्रँडला ( ४५) बाद केले. नेदरलँड्सला ६० चेंडूंत २२१ धावा विजयासाठी हव्या होत्या आणि ४ विकेट्स हाताशी होत्या. कुलदीपने आणखी एक धक्का देताना लॉगन व्हॅन बीकचा(१६) त्रिफळा उडवला. ८ चेंडूंत १६ धावा करणा-या रोएलॉफ व्हॅन डेर मर्वला जडेजाने झेलबाद केला. बुमराहने मॅच संपवली आणि नेदरलँड्सची संपूर्ण टीम ४७.५ षटकांत २५० धावांवर गुंडाळला. रोहितने शेवटची विकेट घेतली. तेजा निदामनुरुने ३९ चेंडूंत ५४ धावा केल्या.
तत्पूर्वी, रोहित शर्मा ( ६१) व शुबमन गिल ( ५१) यांनी शतकी भागीदारी करून टीम इंडियासाठी मजबूत पाया रचला. विराट कोहली ( ५१) व श्रेयस अय्यर यांच्या ७१ धावांच्या खेळीने डावाला आकार दिला. लोकेशने ६४ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०२ धावा केल्या आणि श्रेयससह १२८ चेंडूंत २०८ धावांची भागीदारी केली. श्रेयस ९४ चेंडूंत १० चौकार व ५ षटकारांसह १२८ धावांवर नाबाद राहिला. भारताने ४ बाद ४१० धावा केल्या.