नवी दिल्ली : लोकसभेत कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण) बिल, ज्याला व्हीबी-जी राम जी म्हणूनही ओळखले जाते, त्यावर प्रतिक्रिया दिली. यादरम्यान, विरोधकांनी विधेयकाविरुद्ध घोषणाबाजी करीत कागदे सभागृहात फाडून फेकली.
शिवराज सिंह चौहान म्हणाले, मनरेगा हे मूलत: महात्मा गांधींच्या नावावर नव्हते. ते मूलत: नरेगा होते. नंतर, २००९ च्या निवडणुका आल्या तेव्हा निवडणुका आणि मतांसाठी महात्मा गांधींची आठवण आली. बापूंची आठवण आली. त्यानंतर त्यात महात्मा गांधींचा समावेश करण्यात आला. यानंतर, सभागृहाने व्हीबी-जी राम जी विधेयक आवाजी मतदानाने मंजूर केले. त्याआधी, विरोधकांनी संसद संकुलात निषेध मोर्चा काढला. ५० हून अधिक विरोधी खासदारांनी निषेध मोर्चात भाग घेतला आणि व्हीबी-जी राम जी विधेयक मागे घेण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
बुधवारी, लोकसभेत व्हीबी-जी राम जी विधेयकावर १४ तास चर्चा झाली. कामकाज पहाटे १:३५ वाजेपर्यंत चालले. ९८ खासदारांनी चर्चेत भाग घेतला. २० वर्षे जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणारा प्रस्तावित कायदा स्थायी समितीकडे पाठवावा अशी विरोधकांची मागणी होती.

