30.8 C
Latur
Saturday, May 25, 2024
Homeसोलापूरमाढ्यात विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री सोपल आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीने खळबळ

माढ्यात विजयसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री सोपल आणि माजी आमदार राजन पाटील यांच्या भेटीने खळबळ

रणजित जोशी : सोलापूर
माढा लोकसभेला धैर्यशील मोहिते-पाटील यांनी ‘तुतारी’ हाती घेतल्यानंतर मोहिते पाटलांनी आपले जुने संबंध वापरत जिल्ह्यातील नेत्यांना जवळ करण्याचे धोरण अवलंबले आहे. जिल्ह्यात मोहिते-पाटील गटाला पुन्हा मजबूत करण्यासाठी विजयसिंह मोहिते-पाटील पुन्हा जुन्या संबंधांना उजाळा देत जिल्ह्यातील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पाच वर्षांनंतर पुन्हा त्यांनी पक्षांतर करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी नुकतीच माजी मंत्री दिलीप सोपल व माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मोहिते-पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या बदल्यात रणजितसिंह मोहिते-पाटील यांना आमदारकी देण्यात आली होती, पण माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील यांच्यात वितुष्ट आल्याने मोहिते-पाटील यांनी पक्षांतराचा निर्णय घेतला आहे. त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)पक्षाकडून पूरक अर्जही दाखल केला आहे. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपचे उमेदवार खा. नाईक निंबाळकर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे माढ्याच्या लढतीमध्ये रंगत आली आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांचा अर्ज भरल्यानंतर मोहिते-पाटील कुटुंबीयांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘जनवात्सल्य’ बंगल्यावर जाऊन भोजन केले होते. ही घटना ताजी असतानाच माजी उपमुख्यमंत्री मोहिते-पाटील यांनी बार्शी येथे माजी मंत्री सोपल यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत याशिवाय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्ह्यातील वजनदार नेते माजी आमदार राजन पाटील यांचीही मोहिते-पाटील यांनी अनगर येथे जाऊन भेट घेतली आहे. सोपल हे सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत त्यामुळे पाटलांनी आघाडी धर्म पाळत त्यांची भेट घेणे साहजिकही आहे, मात्र महायुतीमध्ये असलेल्या राजन पाटील यांच्या भेटीने राजकीय पटलावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मोहिते-पाटील यांनी राजन पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या भेटीमागे आ. प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा मुद्दा तर नव्हता ना, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मोहिते-पाटील यांच्या राजन पाटील भेटीमुळे आ. शिंदे यांना दिलासा मिळणार आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगण्यास सोपल विसरले नाहीत. मोहिते-पाटील वैराग येथे पाहुण्यांकडे आले होते. आपण कोठे आहात, असा फोन आला. मी घरीच असल्याचे त्यांना सांगितल्याने ते भेटीस आल्याचे सोपल यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR