35.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिवनिवडून आल्यावर आमचा बी ईचार करा...

निवडून आल्यावर आमचा बी ईचार करा…

भर उन्हात महिला घराबाहेर....

सतीश टोणगे
कळंब : उन्हाच्या चटक्यांप्रमाणेच धाराशिव लोकसभेचा आखाडा दिवसेंदिवस तापू लागला आहे. सर्वच पक्षांचे नेते पक्षाची भूमिका मांडू लागले आहेत आरोप-प्रत्यारोपांनी मतदारांचे मनोरंजन होत आहे. कार्यकर्ते तर जोमात फिरत असून सर्वच पक्षांच्या महिलाही असल्या उन्हात घराबाहेर पडल्या आहेत. चूल-मूल, घरातील सर्व सदस्यांची कामे करून या महिला ग्रामीण भागात प्रचार करताना उमेदवार कसा कामाचा आहे हे सांगत आहेत पण निवडून आल्यावर आमचा बी ईचार करा, असे ग्रामीण भागातील महिला उमेदवारांना खोचक बोलत आहेत.


ग्रामीण भागात प्रचार करताना एक तर सकाळी किंवा संध्याकाळी जावे लागते. पण सध्या तरी घरोघर जाण्यासाठी दिवसभर या महिला फिरत आहेत. उन्हामुळे आबाल-वृद्ध घराबाहेर निघत नाहीत. गावोगावच्या मंदिरांत, समाजमंदिरांमध्ये, झाडाखाली, ज्येष्ठांची मोठी संख्या असते, याचाच फायदा घेऊन प्रचार केला जात आहे. या महिला उमेदवाराच्या वतीने हात जोडून तर कधी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद मागतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने, उमेदवारांनी यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा उभी केली आहे.

महिलांचे अनेक प्रश्न आहेत. ते अद्याप सुटलेले नाहीत. घराबाहेर कामासाठी बाहेर पडणा-या महिलांना संरक्षण नाही, गोरगरीब मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, खासदार, आमदार निधीचे वाटप करताना महिलांना पन्नास टक्के निधी देण्यासाठी विचार करावा. धाराशिव जिल्ह्यात महिला विरुद्ध पुरुष असा सामना रंगत आहे. जुने प्रश्नांवरून प्रचार न करता पुढे महिलांसाठी काय करणार हे सांगण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्रामीण भागातील महिला देत आहेत.

एकंदर पुरुषांप्रमाणेच महिलांनी प्रचारात झोकून दिल्याचे चित्र दिसत असताना, सध्या प्रत्येक गावात पाण्याचा प्रश्न आहे. निदान पाणी तरी आमच्या घरापर्यंत द्या, अशी मागणी पुढे येत आहे. लहान-मोठ्या निवडणुकीत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला प्रचारात असतात, मात्र निवडणूक झाल्यानंतर महिलांना उमेदवार किंवा त्यांचे समर्थक विचारत नसल्याची खंतही महिला बोलून दाखवत आहेत. रस्ता, पाणी, वीज आणि मुलांच्या हाताला काम एवढीच आमची मागणी असते, पण तीही आजपर्यंत कोणी पूर्ण करू शकले नाहीत. ही शोकांतिका आहे. प्रचारासाठी गेलेल्या महिलांना महिला मतदार खडेबोल सुनावत आहेत.

काहीही असो महिलांचे प्रश्न जो सोडविल, महिलांच्या योजना देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा जो प्रयत्न करील त्यांनाच मतदान करण्याचा विचारही या महिला बोलून दाखवत आहेत …..‘आमचा बी ईचार करा’ एवढेच या महिलांचे म्हणणे असून ते बरोबरच आहे ….महिलांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR