22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्यात गावे तहानली

मराठवाड्यात गावे तहानली

- पाणीटंचाईच्या झळा तीव्र - जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणा-या टँकरची संख्या आता अडीचशेच्या पार गेली आहे. गेली तीन ते चार वर्षे सततचा पाऊस, अतिवृष्टीचा फटका मराठवाड्याला बसला. यंदा मात्र सर्वदूर पुरेसा पाऊस झाला नाही.

परिणामी, खरीप पिकांना त्याचा फटका बसला. पाण्याअभावी रबी पिकांनादेखील फटका सहन करावा लागत आहे. मध्यंतरी काही मंडळांत अतिवृष्टी झाली; पण त्याचा फारसा फायदा प्रकल्पातील जलसाठा वाढीसाठी झाला नाही. उलट रबी पिकांसह फळबागांचे मात्र नुकसान झाले. दुसरीकडे पाण्याअभावी तहानलेल्या गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे चित्र आहे.

तीन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांतील १०४ गावे आणि २५ वाड्यांना १२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यात गेल्या महिन्याभरापासून बीड जिल्ह्यातूनही टँकरची मागणी झाली असून, पाणीटंचाईच्या झळा यंदा अधिक असणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसून येत आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११७ गावे व १४ वाड्यांना १४४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालन्यातील ५८ गावे आणि २५ वाड्यांना ११० टँकरद्वारे तर बीड जिल्ह्यातील एक गाव आणि तीन वाड्यांना एका टँकरद्वारे असे या तिन्ही जिल्ह्यांत मिळून तहानलेल्या एकूण १७६ गावे व ४२ वाड्यांना २५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली. यात केवळ एका शासकीय टँकरचा समावेश असून पाणीपुरवठा करणारे उर्वरित टँकर हे खासगी आहेत.

दिवसेंदिवस तहानलेल्या गावांच्या संख्येत होणारी वाढ, तर दुसरीकडे प्रकल्पातील जलसाठ्यात होणारी घट पाहता यंदाच्या उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

३३७ विहिरींचे अधिग्रहण
२८ जानेवारीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील ३३७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८६, जालना १०२, परभणी ५२, नांदेड २, बीड १४ आणि धाराशिव जिल्ह्यात ५५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी ११४ गावांतील १२८ विहिरींचे तर टँकरव्यतिरिक्त १६६ गावांतील २०९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR