इंफाळ : मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यात सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या हल्ल्यात कुकी-झो जमातीच्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हरोथेल आणि कोबशा गावात हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ठार झालेल्या दोघांची नावे लिमाखोंग मिशन वेंग येथील हेनमिनलेन वायफेई आणि खुंखो गावातील थांगमिनलून हँगसिंग अशी आहेत. या घटनेनंतर आदिवासी एकता समितीने एकमताने जिल्ह्यात बंदची घोषणा केली आहे.
राज्य सरकार आपल्याशी भेदभाव करत असून अशा वातावरणात आदिवासी सुरक्षित नाहीत, हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आल्याचे आदिवासी समितीचे म्हणणे आहे. या हल्ल्याची पुष्टी करताना कांगपोकपी जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (कायदा व सुव्यवस्था) थोलू रॉकी यांनी माध्यमांना सांगितले की, जिल्ह्यात सोमवारी सकाळी गोळीबाराची घटना घडली. दोन जणांना जीव गमवावा लागला. प्राथमिक तपासात असे मानले जात आहे की, या हल्ल्यामागे खोऱ्यातील अतिरेकी गटाचा हात आहे. दोन्ही मृतांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. दोन्ही मृत कुकी जमातीचे आहेत. या घटनेनंतर आदिवासी एकता समितीने पुकारलेल्या बंदबाबत पोलीस अधिकारी म्हणाले, परिसरात बंदची अंमलबजावणी सुरू असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
वेगळ्या प्रशासनाची मागणी
मणिपूरमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारानंतर आदिवासी लोक सरकारकडे वेगळ्या प्रशासनाची मागणी करत आहेत. आदिवासी एकता समितीने बोलावलेल्या बैठकीत मणिपूरपासून वेगळे होण्याची मागणी लवकरात लवकर लागू करण्याचे आवाहन केले आहे. कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी-झो सिव्हिल सोसायटीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, केंद्रीय गृह मंत्रालयाने कुकी-झो समुदायाचे ऐकले असते तर अशा हिंसक घटना टाळता आल्या असत्या.