पुणे : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचा बिल्डर बाप विशाल अगरवाल याला पुणे सत्र न्यायालयाने २४ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून अगरवाल याच्यासहित तिघांचा यात समावेश आहे.
सरकारी पक्षाकडून विशाल अगरवाल याच्या सात दिवसांची पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. अगरवाल याने अपघानंतर कोणाकोणाला फोन केले? त्याचे छत्रपती संभाजीनगरला जाण्याचे कारण काय? त्याला तिथे कुणाला भेटायचे होते? अशा आणि अन्य तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी सरकारी पक्षाने पुणे सत्र न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने अगरवाल याला तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या बिल्डर वडील विशाल अगरवाल याला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली. पुण्यातील कल्याणीनगर भागातील या बिल्डरच्या मुलाने शनिवारी मध्यरात्री दुचाकीवरील दोन जणांना उडवले होते. त्यात तरुण व तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला न्यायालयात सादर केले असता, तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी बिल्डर विशाल अगरवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होताच, अगरवाल पुण्यातून फरार झाला होता.