बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. स्पष्ट बोलताना ते अनेकदा जाहीर व्यासपीठावरून आपल्याच कार्यकर्त्यांना खडसावत असल्याचेही पाहायला मिळते. असाच प्रकार आज बारामतीतील एका कार्यक्रमात घडला. अजित पवार हे व्यासपीठावर भाषण करताना त्यांना एकामागोमाग एक अशी विविध निवेदने कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. भाषणादरम्यान सतत येणारी निवेदने पाहून अजित पवार वैतागले आणि मत दिले म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झाला असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्याची खरडपट्टी काढली.
अजित पवार यांच्या हस्ते आज बारामतीत तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंप इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. तसंच पवार यांनी तालुका फळरोपवाटिका, शिवसृष्टी, जलतरण तलाव, कन्हेरी वनोद्यान येथे सुरूअसलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी करुन संबंधित अधिकां-याकडून माहिती घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेटकर, उपविभागीय कृषी अधिकारी तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर येईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी, असे निर्देश बारामती परिसरात सुरु असलेल्या विविध सार्वजनिक विकासकामांच्या पाहणीप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुढे अजित पवार म्हणाले की, शिवसृष्टीची कामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील, याबाबत दक्षता घ्यावी. शिवसृष्टीचे काम पूर्ण झाल्यावर नागरिकांना हेवा वाटेल, असे कामे करावीत. परिसरात अधिकाधिक वृक्षाची लागवड करुन संपूर्ण परिसर हिरवेगार राहील, असे नियोजन करावे. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी, याकरीता आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.