वॉशिंग्टन : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याला अमेरिकन जनतेचा एक स्पष्ट संदेश म्हटले आहे. ओबामा म्हणाले की, मतदारांना असे राजकारण हवे आहे जे लोकांमध्ये फूट पाडण्याऐवजी त्यांना एकत्र आणेल. जनतेला असे नेते हवे आहेत जे त्यांच्या दैनंदिन समस्यांवर ठोस उपाययोजनी करू शकतील.
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाल्यानंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ओबामा म्हणाले की हे निकाल राजकारणातील बदलासाठी अमेरिकन जनतेची इच्छा स्पष्टपणे दर्शवतात. अमेरिकन मतदारांनी विभाजनकारी राजकारण नाकारले आहे. त्यांनी याचे वर्णन एकत्रितपणे काम करणा-या शासनप्रणालीची, ठोस उपायांची आणि लोकांना प्राधान्य देणा-या नेतृत्वाची मागणी असे केले.
ओबामा यांनी विविध मतदारसंघांमधून निवडणूक लढवणा-या उमेदवारांची प्रशंसा केली. ते म्हणाले की, देशाच्या प्रत्येक प्रदेशात, अगदी डेमोक्रॅटिक उमेदवारांसाठी पूर्वी कठीण मानल्या जाणा-या भागांमध्येही, सशक्त उमेदवार पुढे आल्यामुळे हा निकाल शक्य झाला. ओबामांच्या मते, या उमेदवारांची पार्श्वभूमी वेगवेगळी होती आणि राजकीय विचारही भिन्न होते, परंतु ते समान मूल्ये, लोकसेवेवरील विश्वास आणि आपल्या मतदारसंघातील लोकांना प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेने एकत्र आले होते.
माजी राष्ट्रपतींनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करणा-या हजारो निवडणूक अधिकारी आणि स्वयंसेवकांचेही आभार मानले. ते म्हणाले की दोन्ही राजकीय पक्षांच्या अधिका-यांनी आणि स्वयंसेवकांनी निवडणुकीच्या यशात योगदान दिले. ओबामांनी याला लोकशाहीच्या सर्वात आवश्यक कार्यांपैकी एक म्हटले आहे. आपल्या निवेदनात, ओबामांनी पुढे म्हटले की, सध्याच्या प्रशासनाकडे अजून दोन वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळे, त्यांच्या पक्षाने आणि मित्रपक्षांनी कंबर कसून कामाला लागले पाहिजे. जिथे जिथे बदल घडवण्याची शक्ती त्यांच्याकडे आहे, तिथे त्यांनी बदल घडवले पाहिजेत, पुढील नुकसान टाळले पाहिजे आणि भविष्यासाठी तयारी केली पाहिजे.
तर आम्हीच जिंकलो असतो : ट्रम्प
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या मोठ्या पराभवानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की जर त्यांचे नाव मतपत्रिकेवर असते, तर त्यांच्या पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला असता. तसेच त्यांनी निवडणुकीचे निकाल स्वीकारण्याची आणि डेमोक्रॅट्ससोबत काम करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या या दोन्ही विधानांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया अकाउंटवरील एका पोस्टद्वारे आली. त्यांनी ट्विट केले की त्यांचे नाव मतपत्रिकेवर नव्हते आणि जर असते, तर आम्ही मोठ्या फरकाने जिंकलो असतो. आपल्या विधानात, त्यांनी प्रचंड मताधिक्याने जिंकण्याचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी निवडणुकीच्या निकालांच्या कारणांवर थेट भाष्य केले नाही. त्यांनी दावा केला की जर त्यांचे नावही मतपत्रिकेवर असते, तर रिपब्लिकन पक्षाने मोठ्या फरकाने विजय मिळवला असता.
















