35.5 C
Latur
Saturday, March 14, 2026
Homeराष्ट्रीयवांगचुक यांची नजरकैद रद्द

वांगचुक यांची नजरकैद रद्द

एनएसएअंतर्गत केलेली कारवाई मागे

नवी दिल्ली : लडाखमधील पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने त्यांच्या विरोधातील नजरकैद तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार लागू केलेली कारवाई मागे घेतल्याची माहिती दिली आहे.

गृह मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केले असून सरकार लडाखमध्ये शांतता, स्थिरता आणि परस्पर विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे. सर्व संबंधित पक्षांशी संवाद घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. मंत्रालयाच्या निवेदनात असेही नमूद करण्यात आले आहे की, लडाखच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याची सरकारची भूमिका कायम आहे. तसेच लडाखशी संबंधित मुद्दे चर्चेद्वारे आणि संवादाच्या माध्यमातून सोडवले जातील, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

यासाठी उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून चर्चा केली जाईल. वांगचुक यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लेहमध्ये झालेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ताब्यात घेण्यात आले होते. त्या आंदोलनांमुळे लडाखमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सरकारने सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी वांगचुक यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले होते.

सरकारने त्यांच्यावर नॅशनल सिक्युरिटी अ‍ॅक्टअंतर्गत कारवाई करत त्यांना राजस्थानमधील जोधपूर येथील तुरुंगात ठेवले होते. या कारवाईमुळे देशभरात चर्चा झाली होती आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. आता सरकारने त्यांची नजरकैद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या निर्णयामुळे लडाखमधील परिस्थिती शांत करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, लडाखमधील विविध प्रश्नांवर सरकार आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यात संवाद सुरू राहणार असल्याचेही गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.