परभणी : नोकरी आणि कामधंद्याच्या निमित्ताने पुणे येथे असलेल्या नागरिकांना दिवाळी सणाकरिता मराठवाडयात येण्यासाठी दमरेने एकही स्पेशल गाडी घोषित केलेली नाही. या बाबत नांदेड येथे विभागीय व्यवस्थापकांना एक निवेदन दिले असून दि. २५ ऑक्टोबर पर्यंत पुणेसाठी विशेष रेल्वे घोषित करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुणेसाठी विशेष रेल्वे घोषित न केल्यास दि. २७ ऑक्टोबर रोजी दक्षीण मध्य रेल्वे विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाने दिला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण आणि कामधंद्याच्या निमित्ताने मराठवाडयातील जवळपास ४० हजार विद्यार्थी, चाकरमानी पुणे येथून आपआपल्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मराठवाड्यात येतात. मागील अनेक वर्षांपासून पासून दिवाळीत धनतेरस पासून भाऊबीज पर्यंत पुणे येथून विशेष रेल्वे दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून चालवण्यात येत होती. मात्र या वर्षी दिवाळीला आता केवळ पाच सहा दिवस राहिले असताना देखील पुणे येथून मराठवाड्यात येणारे प्रवाशांकरिता अद्याप एक ही रेल्वे उपलब्ध करून दिली नाही.
दि. २० सप्टेंबर रोजी नांदेडचे महाप्रबंधक याना प्रत्यक्ष भेटून नांदेड-पुणे तसेच परभणी मार्गे नागपूर-पुणे दरम्यान विशेष रेल्वेसाठी निवेदन दिलीत. तरी देखील अद्याप दिवाळीत पुणेला विशेष रेल्वे दिली नसल्याने दि.२२ ऑक्टोबर रोजी प्रवासी महासंघाने महाप्रबंधक याना आणखीन एक निवेदन सादर करण्यात आले. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळल्याने प्रवासी महासंघ आक्रमक झाली असून दि. २५ ऑक्टोबर पर्यंत पुणेला जोडून विशेष रेल्वे घोषित न केल्यास परभणी स्थानकावर दि. २७ ऑक्टोबर रोजी दक्षिण-मध्य विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
दक्षिण-मध्य रेल्वे विभागाकडून मराठवाड्यातील प्रवाशांवर सतत अन्याय करण्यात येत आहे. दिवाळीला देखिल पुणे आणि नागपुरसाठी विशेष रेल्वे गाड्यातून वंचित ठेवण्यात येत आहे. मराठवाड्यातील प्रवाशांवर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्याकरिता दि. २७ ऑक्टोबर रोजी दक्षिण-मध्य रेल्वे विभाग विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाकडून अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, राजेंद्र मुंडे, रूस्तम कदम, कदीर लाला हाशमी, माणिक शिंदे, डॉ. किरण चिद्रवार, केदार जाधव, विठ्ठल काळे, रितेश जैन, प्रवीण थानवी, बाळासाहेब देशमुख, डॉ. राजगोपाल कलानी, दयानंद दीक्षित आदीने दिला आहे.