वॉशिंग्टन : युरोपीय देश आता पश्चिम आशियात एअरक्राफ्ट कॅरिअर पाठवण्याचा विचार करत आहेत. युद्ध जिंकल्यानंतर त्यात सहभागी होणा-या लोकांची अमेरिकेला गरज नाही अशा शब्दात राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांना फटकारले आहे. इराणवर अमेरिका इस्रायल हल्ल्यात ब्रिटनचा पाठिंबा न मिळाल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, यूनाइटेड किंगडम जो आमचा कधीकाळी महान मित्र होता, अखेर तो मध्य पूर्वेत २ विमानवाहू युद्धनौका पाठवण्यावर गंभीर विचार करत आहे. ठीक आहे, पंतप्रधान स्टार्मर आम्हाला आता त्याची गरज नाही. परंतु आम्ही हे लक्षात ठेवू. आम्हाला अशा लोकांची गरज नाही जे युद्ध जिंकल्यानंतर त्यात सहभागी होतील अशी परखड नाराजी त्यांनी व्यक्त केली. बुधवारी ब्रिटनच्या संसदेत पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी अमेरिकेची विमाने ब्रिटीश ठिकाणांवरून उड्डाण घेत आहेत. हे आमचे नाते आहे.
मध्य पूर्वेतील अमेरिकन नागरिकांचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिश जेट्स आमच्या संयुक्त तळांवरून ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडत आहेत. हे या खास नात्याचे खरे सार आहे. आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी दररोज गुप्त माहिती शेअर केली जात आहे. हेच या खास नात्याचे मूळ आहे असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय इराणवरील हल्ल्यात सहभागी न होण्याचा निर्णयही त्यांनी योग्य असल्याचे सांगितले. इराणवर कारवाईसाठी कायदेशीर आधार दिसत नाही असं ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले.
दरम्यान, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने ७ मार्चपासूनच्या ऑपरेशन्स अपडेट्स शेअर केले आहेत. अमेरिकेने इराणला या प्रदेशात क्षेपणास्त्रे डागण्यापासून रोखण्यासाठी बचावात्मक कारवायांसाठी ब्रिटिश तळांचा वापर सुरू केला आहे. ज्यामुळे ब्रिटिश नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील ब्रिटनच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध खराब केल्याबद्दल कीर स्टार्मर यांच्यावर टीका केली.

