जळगाव : राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांसारखे भूत आवरावे असे म्हणत घणाघती टीका केली आहे. तसेच आम्हाला गद्दार म्हटले गेले असले तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो. आम्ही गद्दारी केली नाही पक्ष वाचवला, असे ते जळगावमध्ये एका कार्यक्रमात बोलता म्हणाले.
तसेच ते म्हणाले की, एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे, राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा. शिवसेनेने जो पवित्रा घेतला आहे तोच पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. हा निकाल अन्यायकारक नाही, ज्या चाळीस लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला सावध केले होते. तुम्ही त्याला महत्व दिले नाही उलट त्यांनी या बाबत विचार करायला हवा होता मात्र त्यांनी तो केला नाही. त्यामुळे ते जनतेत जरी फिरले तरी आम्ही गद्दारी केली असे जनता त्यांना म्हणणार नाही. गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे.