मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ला भेट दिली आहे, तीन महिन्यांमधील ही ठाकरे बंधूंची सातवी भेट आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींना महत्त्व प्राप्त झाले आहे.
यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले होते, त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर आता दोन्ही ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ठाकरे बंधुंच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोठे विधान केले आहे.
रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत, प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही, ठाकरे बंधूप्रमाणेच आमच्याही भेटी वाढल्या पाहिजेत असे आठवले यांनी म्हटले आहे, पुढे बोलताना ते म्हणाले की, ऐक्य हा सर्वांच्याच आवडीचा विषय आहे, माझ्या आवडीचा विषय आहे, पत्रकारांच्या आवडीचा विषय आहे, परंतु आता शिवसेनेमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात.
राष्ट्रवादीमध्ये ऐक्य होत का ते पाहूयात, पण जर असं ऐक्य होत असेल तर त्या ऐक्याला माझा पाठिंबा आहे. मी अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगितले आहे, प्रकाश आंबेडकरांनी नेतृत्व करावे. मला वाटते जशा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत, तशा माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्याही भेटीगाठी व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे असे आठवले यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे ‘मातोश्री’वर
आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मातोश्रीवर हजेरी लावली आहे, राज ठाकरे सहकुटुंब आज मातोश्रीवर दाखल झाले. गेल्या तीन महिन्यांमधील दोन्ही ठाकरे बंधुंची ही सातवी भेट आहे. सरकारने त्रीभाषा सुत्रीचा अध्यादेश रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर आले होते, त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधुंच्या भेटीगाठीला सुरुवात झाली आहे.