मुंबई : टीम इंडियातील माजी खेळाडू आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा शालेय मित्र विनोद कांबळी सध्या अनेक संकटांना तोंड देत आहे. आर्थिक अडचणीसह त्याला अनेक आजारांनी ग्रासले आहे. विनोद कांबळी नुकताच रमाकांत आचरेकर यांच्यासाठी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात आला होता. त्यावेळी त्याची भेट सचिन तेंडुलकर याच्याशी झाली.
त्याचा तो व्हीडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हीडीओत विनोद कांबळीची नाजूक परिस्थिती दिसत आहे. त्याची प्रकृती खूप खालावली आहे. त्याला बोलण्यासाठी त्रास होत असल्याचे दिसत आहे. त्याची ही परिस्थिती पाहून क्रिकेटप्रेमी आणि माजी खेळाडूंकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान भारताचा दिग्गज क्रिकेटपटू कपिलदेवने विनोद कांबळीच्या मदतीसाठी तयारी दर्शवली आहे. परंतु त्यासाठी एक अट ठेवली आहे. विनोद कांबळी याला नैराश्यामुळे दारूचे व्यसन लागले आहे. यामुळे त्याचे अनेक सहकारी क्रिकेटपटू त्याच्यापासून दूर गेले आहेत. प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती समारंभातही सचिन तेंडुलकर त्याला भेटला. परंतु त्याला भेटत असताना सचिनला बराच संकोच झाला होता. विनोद कांबळी याने सचिनचा हात धरला होता आणि सोडत नव्हता.
विनोद कांबळी संदर्भात बोलताना त्याचे जवळचे सहकारी आणि माजी भारतीय पंच मार्कस कौटो यांनी सांगितले की, विनोद कांबळी याला अनेक गंभीर आजार झाले आहे. तो यापूर्वी १४ वेळा दारु सोडण्यासाठी पुनर्वसन केंद्रात गेला आहे. त्यामुळे आता त्याला पुन्हा पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात काही अर्थ नाही. त्याला मी स्वत: ३ वेळा पुनर्वसनास केंद्रात नेले. पण काहीही फायदा झाला नाही. तो दारुचे व्यसन सोडण्यास तयार नाही.
कपिलदेवने मदतीसाठी दर्शवली तयारी
विनोद कांबळी याच्या या सगळ्या प्रकारानंतरही भारताला प्रथमच विश्वविजेता बनवणारा कर्णधार कपिल देव याच्या मदतीसाठी तयार झाला आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील बलविंदर सिंधूने सांगितले की, मी कपिल देव यांच्याशी बोलले आहे. ते विनोद कांबळीला आर्थिक मदत करू इच्छित आहेत. परंतु विनोद कांबळी याने आधी दारू सोडण्यासाठी पुनर्वसनासाठी जावे, अशी त्याची इच्छा आहे. यानंतर उपचार कितीही लांबले तरी सर्वजण मिळून बिल भरण्यास तयार असतात.