मुंबई : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच अधिवेशनात मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी देखील काही महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्याच्या राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मराठवाड्याला काय मिळाले?
१) जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये
२) सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु
३) जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
४) जालना-खामगाव, अदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
५) छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी
६) जालना, हिंगोली जिल्ह्यांत प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित ४३० खाटांचे रुग्णालय
६) मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये १५ खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर
७) रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका
८) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांसाठी उच्च दर्जाच्या सुविधा
९) राज्यातील २ ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ (जिल्हा हिंगोली) आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री क्षेत्र माहुरगड (जिल्हा नांदेड) तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना
१०) धाराशीव जिल्हयात संत गोरोबाकाका महाराज यांच्या स्मारकासाठी शासकीय जमीन व निधी.