छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मनोज जरांगे-पाटील यांनी काल ५०० कोटी रुपयांचा कोणताही थेट आरोप केलेला नव्हता. एकनाथ शिंदे यांनी पैसे घेतले नाहीत आणि दिलेही नाहीत, हे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे तो विषय तिथेच संपला आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, मी जरांगे-पाटील यांना विनंती करतो की, जर त्यांच्याकडे बदनामी करणा-यांची नावे असतील तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजेत. त्यामुळे अशी बदनामी करणा-यांच्या मनात आपण उघडे पडू, अशी भीती निर्माण होईल. रोज एकमेकांचे डोके फोडणे आणि परस्परांविरोधात बोलणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. राजकारण एका बाजूला ठेवा, पण जर समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण झाली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.
संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे आरोप केले आहेत, त्या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. यातून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ झालेच पाहिजे. मनोज जरांगे-पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्याविरोधात कोण कारस्थान करत आहे? कोण कोणाला बदनाम करत आहे? आणि कोणी कोणाला सुपारी दिली आहे? हा संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला पाहिजे.
संजय शिरसाट म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांनी ज्या चौकशीची मागणी केली आहे, तीच मागणी एकनाथ शिंदे यांनीही केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य काय आहे ते समोर आले पाहिजे. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे लोक नेमके कोणाचे समर्थक आहेत आणि त्यांनी असे वक्तव्य का केले, हे लोकांसमोर आलेच पाहिजे. ऑडिओ क्लिप खरी आहे की बनावट, हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे.
















