नवी दिल्ली : दिल्लीतील वातावरण अजूनही सुधारलेले नाही. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी सध्यातरी कमी होताना दिसत नाही. राजधानीतील हवेचा दर्जा गुरुवारी निर्देशांक ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवला गेला. धुक्याचा थर सर्वत्र दिसला आहे. हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी शेतातील कचरा किंवा भुसा जाळणे हे दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमुख कारण मानले जाते. तसेच दिवाळीत फटाके फोडल्याने प्रदूषणाची पातळी आणखी वाढली आहे. यामुळे प्रदूषणापासून दिल्लीची सुटका कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिल्लीची हवा अजूनही ‘खूप खराब’ श्रेणीत आहे. मात्र, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी प्रदूषणात घट झाली आहे. बुधवारी राजधानीतील हवा तीव्र खराब श्रेणीत होती परंतु गुरुवारी ती तीव्रतेपेक्षा थोडी कमी परंतु अत्यंत खराब अशी नोंद झाली आहे. राष्ट्रीय राजधानीत दररोज दुपारी ४ वाजता नोंदवलेला हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बुधवारी ४०१, मंगळवारी ३९७, सोमवारी ३५८ आणि रविवारी २१८ इतका एक्यूआय नोंदवला गेला. शेजारील गाझियाबाद (एक्यूआय ३७८), गुरुग्राम (२९७), ग्रेटर नोएडा (३३८), आणि फरिदाबाद (३९०) येथेही हवेची गुणवत्ता खूपच खराब झाली आहे.
दिल्ली सरकारने प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली आहेत. यात बांधकाम कामावर बंदी आणि शहरात डिझेलवर चालणाऱ्या ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालणे असे निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी गेल्या काही दिवसांत दिल्लीची हवेची गुणवत्ता खालावली आहे. दिवाळीपूर्वी दिल्लीत पाऊस पडल्याने एक्यूआय कमी झाला होता. मात्र दिवाळीत फटाके फोडल्याने हवेची गुणवत्ता अजून खराब श्रेणीत पोहचली आहे.
टास्क फोर्सची स्थापना
दिल्लीतील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅनच्या (जीआरएपी) नियमांचे पालन करण्यासाठी सहा सदस्यीय विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. या टास्क फोर्सचे नेतृत्व पर्यावरण विभागाचे विशेष सचिव करणार आहेत. दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रदूषणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.