29.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रतुम्ही कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही

तुम्ही कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही

सुपे : जनाईच्या पाण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती कुणालाही भेटून निवेदन देत आहे. मी स्वत: सुप्यात आलो तर या समितीतील एकही सदस्य उपस्थित नाही. त्यामुळे तुम्ही मुंबईला अन्यथा कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सुपे येथील माउली गार्डन येथे दुष्काळी पाणीटंचाईसंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दुगल, जनाईचे कार्यकारी अभियंता कानिटकर, खडकवासला विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कु-हाडे आदींसह प्रांताधिकारी, तहसीलदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, पुरुषोत्तम जगताप, केशव जगताप, पोपट गावडे, प्रशांत काटे, विक्रम भोसले, दत्तात्रय येळे आदींसह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत. मात्र जनाईच्या पाण्याबाबत नेहमीच अधिका-यांना सांगून अधिकचे पाणी कसे देता येईल ते सांगितले आहे. पूर्वी पुण्याला ५ टीएमसी पाणी लागत होते आत्ता २० टीएमसी लागत आहे. येथे कालवा पाइपलाइन करावी, अशी मागणी आहे. मात्र ते तुम्हालाच पुढे जड जाणार आहे. तुम्ही म्हणाला तर तेही करू. सुप्यात ग्रामपंचायतीने जागा दिल्यास जलसंपदा शाखेचे ऑफिस काढू तशा सूचनाही पाटबंधारे विभागाला दिल्या. सुपे आणि परिसरातील रस्त्यांची, सभागृहांची अथवा रुग्णालय, पोलिस ठाणे इमारत आदी सुमारे ६५३ कोटींची कामे झालेली आहेत, तर काही सुरू आहे. एवढी विकासकामे कोणीही आजपर्यंत केली नाहीत. क-हा नदीवरील बंधा-यांच्या दुरुस्तीसाठी ४५ कोटी मंजूर केले आहेत, तर अजून १५ कोटी मंजूर करणार आहे.

नवीन कोणतेही धरण बांधायचे झाले तर पहिले बंद पाइपलाइनने शेतीला पाणी देण्याचा निर्णय शासनाचा झालेला आहे. त्यामुळे यापुढे बंद पाइपलाइननेच पाणी मिळेल. शेतकरी संघर्ष कृती समितीला निरोप नसल्याने आम्ही बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. मात्र आमच्या नियमित हक्काच्या पाण्यासाठी लढा सुरू ठेवणार असल्याचे समितीचे अध्यक्ष पोपट खैरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी होळकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लोणकर यांनी केले, तर मान्यवरांचे स्वागत सरपंच तुषार हिरवे यांनी केले.

पाणीपट्टी वेळेवर भरा
जनाईचे विजेचे बिल कमी होणार नाही. मागील चार महिन्यांपूर्वीच ५ पट असणारे वीजबिल एक पट केले आहे. त्यामुळे शासनावर ७०० कोटींचा वीजबिलाचा बोजा पडला आहे. त्यामुळे जनाई, शिरसाई आणि पुरंदर या योजना लवकरच सोलरवर सुरू करण्याबाबत संबंधित अधिका-यांना बैठकीत सूचना केल्या आहेत. सोलर योजनेची पहिली सुरुवात जनाईपासून करा, असे सांगत शेतक-यांनी पाणीपट्टीचे बिल वेळोवेळी भरणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR