उदगीर : येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकड कापल्याचा प्रकार समोर आला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. यातील दोषींवर कारवाई होईल असे त्यांनी बुधवारी मुंबई येथे माध्यमांना सांगितले.
सोशल मीडियावर येथील पोलिस ठाण्याच्या गेटवर बकऱ्याचा बळी दिल्याचा फोटो व्हायरल झाला होता. गुन्हेगारी कमी करण्यासाठी हा प्रकार केल्याची चर्चा होती. पण याबाबत अशी माहिती समोर येत आहे, की एका पोलिस अधिकाऱ्याने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले होते. त्याच्या आनंदाप्रीत्यर्थ हा बोकड कापून पार्टी करण्यात आली.
विशेष म्हणजे या बोकडाच्या मटणाची बिर्याणी करून मलकापूर येथील एका राजकीय व्यक्तीच्या फार्महाऊसवर अधिकारी व पोलिसांनी ताव मारला. हा प्रकार सामुदायिक असल्याचे दिसून येत आहे. याची गृहखात्याने दखल घेतली असून प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी सांगितले, की यात सहभागी असलेले दुय्यम अधिकारी व कर्मचारी जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार आहे.