नवी दिल्ली : शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची? मूळ शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरे २ फेब्रुवारीला मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर २ फेब्रुवारीला महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी २०२३ रोजी एक अंतिम निकाल शिवसेनेच्या वादावर दिला होता. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले गेले होते. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेत शिंदेंनी भाजपसोबत सरकार तर स्थापन केले. पण आता शिवसेनचे चिन्ह त्यांच्या ताब्यात येणार का या प्रश्नाचे उत्तर अजून बाकी आहे. या लढाईचा पुढचा अंक निवडणूक चिन्हावरुन होणा-या लढाईत पाहायला मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी अद्याप झालेली नाही. २ फेब्रुवारीला या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी सर्वमान्य चिन्ह हे महत्वाचे असते. शिवसेनेचा धनुष्यबाण अगदी खेडोपाड्यात पोहचलेला आहे. त्याचमुळे हे चिन्ह ज्याच्याकडे त्याचे पारडे जड असेल. ठाकरेंचे सरकार तर शिंदे गटने उलथवले, आता शिवसेनाही त्यांच्याकडून हिसकावणार का…हे या लढाईवर अवलंबून असेल.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या निकालपत्राचा मसुदा कायदेशीर अभिप्रायासाठी दिल्लीतील तज्ज्ञांकडे पाठवल्याचे समजते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १० जानेवारीपर्यंत निकाल देणं अनिवार्य आहे. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी १० जानेवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष १० जानेवारीपर्यंत वाट न पाहाता, आजकिंवा उद्यापर्यंतच निकाल जाहीर करू शकतात, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.