25.8 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeमहाराष्ट्रविधानसभेत एकत्र लढणार, फुटिरांचा परतीचा दोर कापला

विधानसभेत एकत्र लढणार, फुटिरांचा परतीचा दोर कापला

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महाविकास आघाडीत कुरबुरी सुरू झाल्याची चर्चा होती. मात्र, आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सर्व चर्चांना पूर्णविराम देतानाच आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने आणि सर्व घटकांना सामावून घेत लढणार असल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यामुळे महाविकास आघाडी पुन्हा एकदा विधानसभेला एकत्रित दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महाविकास आघाडीकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत, आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, खासदार अनिल देसाई, अरविंद सावंत, वंदना चव्हाण उपस्थित होते.आदी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली. आज तीन पक्षांची प्राथमिक बैठक झाली. ही बैठक विधानसभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने होती. लोकसभेसाठी आम्ही ज्या पद्धतीने लढलो, त्यापेक्षा अधिक ताकदीने लोकांचे प्रश्न मांडून विधानसभेतही बदल करू, असा विश्वास पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. ही पत्रकार परिषद जनतेचे आभार मानण्यासाठी आहे. लोकशाही वाचविण्यासाठी जनतेने आम्हाला मत दिल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या राज्यात जेवढ्या जास्त सभा होतील, तेवढे आमची स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असा टोलाही पवार यांनी लगावला. देशात होत असलेल्या सत्तेच्या गैरवापरावर लोकांनी या निवडणुकीतून जी भूमिका घेतली, त्यामधून शहाणपणा शिकतील, अशी अपेक्षा होती. पण तो शहाणपणा सरकार शिकेल, असे दिसत नाही. त्यामुळे आणखी दोन-तीन महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी मिळेल, तेव्हा लोक पूर्ण विचार करून ठोस निर्णय घेतील, असे शरद पवार म्हणाले.

मोठा भाऊ, छोटा भाऊ असे कोणी राहणार नाही
पृथ्वीराज चव्हाण यांनी जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरून सूचक भाष्य केले. गेल्या काही दिवसांपासून मविआ नेत्यांकडून जी वक्तव्ये केली जात होती, त्याचा समाचार घेत त्यांनी आता मोठा भाऊ, छोटा भाऊ असे कोणी राहणार नाही. ज्या पक्षाचे जे उमेदवार चांगले असतील आणि निवडून येण्याची शक्यता असेल, त्यांची ती जागा असेल असे ते म्हणाले.

ठाकरे, पवारांचे महत्त्व अधोरेखित
राज्यात सर्वाधिक जवळपास प्रत्येक मतदारसंघांत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि मग शरद पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या दोन नेत्यांना महत्व देत एक प्रकारे महाविकास आघाडीच्या विजयातील त्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

पवारांचा मोदींना टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, देशाच्या पंतप्रधान मोदी यांनी राज्यात १८ सभा घेतल्या. एक रोड शोसुद्धा झाला. विधानसभेलाही जेवढ्या त्यांच्या सभा होतील, तेवढा आम्हाला फायदा होईल, अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांवरून टोला लगावला.

फडणवीस यांना ठाकरेंचा सवाल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आमची लढाई ४ पक्षांविरुद्ध होती. चौथा पक्ष फेक नेरेटिव्ह असल्याचे म्हटले. संविधान बदलण्याचा खोटा प्रचार केल्याचा आरोप फडणवीसांनी केला. यावर ठाकरे यांनी यांना मते दिली तर तुमची संपत्ती जास्त मुले होणा-यांना वाटतील, मंगळसूत्र उचलून नेतील, तुमच्या घरातील नळ कापून नेतील, वीज कापतील हे काय खरे नरेटिव्ह होते का, असा प्रतिसवाल केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR