छ. संभाजीनगर : मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय. मी आज जालन्यातील अंतरवाली सराटीत जाणार आहे. गावात जाईल. पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी घराच्या उंब-यावर पाय ठेवणार नाही, असे सांगतानाच यंदा मी दिवाळीही साजरी करणार नाही. माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या असताना आणि त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी दिवाळी कशी साजरी करू?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी १५ ते २३ तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि परत मराठवाडा अशा माझ्या गाठीभेटी असणार आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे. आता मी अंतरवालीला निघालोय. पण घराकडे जाणार नाही. दिवाळी साजरी करणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, दु:खाचं सावट आहे. त्यामुळे आनंद कसा साजरा करणार? त्यामुळे वैयक्तिक दिवाळी साजरी करणार नाही. डिस्चार्ज आज होणार आहे. पण रात्रीच आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबातील लोकांना भेटून आलो, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
सरकारशी बोलतोय. सरकार आमच्याशी बोलत आहे. आमचा सरकारवर काहीच दबाव नाही. मी शांततेत गाठीभेटी घेत आहे. लोकांचे आशीर्वाद घेत आहे. या पलिकडे काही नाही. कोण उद्रेक करणार हे सरकारला माहीत आहे. साखळी उपोषण हे शांततेचे अस्त्र आहे. जगात तेच वापरले जाते. जर त्याला सरकारचा किंवा कुणाचा आक्षेप असेल तर त्यात एवढे दु:ख नाही, असे सांगतानाच मुख्यमंत्री कार्यालयाने अंतरवालीला जाण्याच्या आत पत्र देऊ किंवा तिथे गेल्यावर देऊ असे म्हटले आहे. अंतरवालीत मी दोन दिवस आहे. दोन दिवसांनंतर बघू, असे जरांगे पाटील म्हणाले.
आत्महत्या करू नका
कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळेल. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. दोन-चार दिवस लेट मिळतील. पण आत्महत्या करू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो. आता ऐका. सर्वांना प्रमाणपत्र मिळत आहे. तुम्हालाही मिळणार आहे. सर्वांनी आणखी आरक्षण मिळण्यासाठी कामाला लागा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.