34.8 C
Latur
Tuesday, June 10, 2025
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खान तुरुंगातून सुटणार?

इम्रान खान तुरुंगातून सुटणार?

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे संस्थापक इम्रान खान हे कारावासातून सुटण्याची शक्यता आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणी उद्या ११ जून रोजी इस्लामाबाद उच्च न्यायालयात इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांच्या शिक्षेच्या निलंबनाच्या याचिकांवर सुनावणी होणार आहे. यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.

इम्रान खान यांच्याविरुद्ध अनेक फौजदारी खटले सुरू आहेत, त्यामुळे ते ऑगस्ट २०२३ पासून आदियाला तुरुंगात आहेत. अल-कादिर ट्रस्ट प्रकरण हे सर्वात हाय-प्रोफाइल प्रकरणांपैकी एक आहे, ज्यामध्ये माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अल-कादिर ट्रस्ट प्रकरणावर बोलतान पीटीआयचे प्रख्यात वकील आणि नेते गौहर अली खान म्हणाले की, ११ जून हा पक्षाचे संस्थापक इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीसाठी महत्त्वाचा दिवस ठरू शकतो. या दिवशी त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. अल-कादिर ट्रस्ट हे प्रकरण युनायटेड किंग्डमच्या नॅशनल क्राइम एजन्सी (एनसीए) ने प्रॉपर्टी टायकून मलिक रियाझ यांच्या कुटुंबाकडून १९० दशलक्ष पौंड जप्त केल्याशी संबंधित आहे. इम्रान खानच्या सरकारमध्ये असताना हे पैसे पाकिस्तानी राष्ट्रीय तिजोरीत जमा करण्याऐवजी ते मलिक रियाझ यांच्या कंपनी बहरिया टाउनच्या देणग्यांमध्ये सामील केली. याच्या बदल्यात, मलिक रियाझ यांनी कराचीच्या बाहेर शेकडो एकर जमीन अल-कादिर ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

या ट्रस्टचे विश्वस्त इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी आहेत. या सर्व प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे. सध्या एनएबी या प्रकरणाची चौकशी करत आहे. या तपासाबाबत न्यायालयात काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यांची सुनावणी आता ११ जून रोजी होणार आहे. यात इम्रान खानला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR