नवी दिल्ली : पैशाच्या बदल्यात लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस संसदेच्या शिस्तपालन समितीकडून करण्यात आली आहे. या समितीने ६ विरुद्ध ४ अशा मत फरकाने याबाबतचा अहवाल स्वीकारला. हा अहवाल आता लोकसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येईल.
या समितीच्या सुमारे ५०० पानांच्या अहवालात खा. मोईत्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम घडवेल, अशाप्रकारचे गैरवर्तन केल्याचा ठपका खा. मोईत्रा यांच्यावर ठेवण्यात आला आहे. उद्योगपती दर्शन हिरानंदानी आणि मोईत्रा यांच्यादरम्यान जो आर्थिक व्यवहार झालेला आहे त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे समितीकडून सांगण्यात आले. भाजपचे खासदार विनोदकुमार सोनकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. समितीच्या २ नोव्हेंबरच्या बैठकीत मोईत्रा यांची चौकशी झाली होती. त्यावेळी सोनकर यांनी काही प्रश्न मोईत्रा यांना विचारले होते.