मुंबई : मलंगगडावरून पुन्हा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. मलंगगडावरून असदुद्दीन ओवेसी पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, याच मुद्यावरून ओवेसी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र डागले आहे. मुख्यमंत्र्यांना ही भाषा शोभत नाही, असे म्हणत खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरून ओवेसी यांनी परखड टीका केली आहे.
मलंगगड मुक्तीच्या भावना पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या वक्ह्याव्यानंतर मलंगगडाच्या नावाचा वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा दिला होता. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या संबंधित सर्व सरकार मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. दोन्ही धर्मांचे लोक या जागेवर दावा करतात. मलंगगडाच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे, हाजी मलंग दर्गा. जो बाराव्या शतकात मध्यपूर्वेतून भारतात आलेला एक सूफी संत बाबा अब्दुर रहमान मलंग यांना समर्पित आहे. हा दर्गा तब्बल ३०० वर्षे जुना आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, मलंगगड मौर्य वंशाचा राजा नालेदेव याने सातव्या शतकात बांधला होता.
हा किल्ला टेकडीच्या तीन छोट्या भागांवर बांधला गेला आहे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या कल्याणमध्ये आहे.
हिंदू समुदायाचा एक भाग याला मच्छिंद्रनाथ समाधी म्हणून ओळखतो. अनेक भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. श्री मलंगगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंद्रनाथांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात.
तर दुसरीकडे तेराव्या शतकात येमेनहून आलेले सूफी संत सूफी फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग ऊर्फ मलंग बाबा यांची ही कबर आहे. दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक-एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.
मलंगगड मुक्तीची मागणी पूर्ण करणारच : मुख्यमंत्री शिंदे
मलंगगड येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी, स्थानिकांच्या मलंगगड मुक्तीच्या भावनांची आपल्याला कल्पना असून, ती मागणी पूर्ण करणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, काही गोष्टी अशा जाहीरपणे बोलता येत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.