तेलअलीव : इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात ५० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. याच दरम्यान, दहशतवादी संघटना हमासला सध्या सुरू असलेल्या युद्धविराम वाढवायचा आहे. हा युद्धविराम चार दिवसांसाठी होता, जो सोमवारी मध्यरात्री संपेल.
न्यूज एजन्सी एएफपीने घडामोडींशी संबंधित लोकांचा हवाला देत म्हटले आहे की, हमासने मध्यस्थांना कळवले की ते दोन ते चार दिवस युद्धविराम वाढवण्यास ते इच्छूक आहेत. हमासचा असा विश्वास आहे की जर युद्धविराम पुढे नेला गेला तर किमान २० ते ४० इस्रायली ओलिसांची सुटका सुनिश्चित करणे शक्य आहे. युद्धविराम करारानुसार, १५० पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या ५० लोकांना चार दिवसांत सोडण्यात येणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अद्याप हल्ले लवकर थांबतील असे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. ७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रथमच गाझाला भेट दिली आणि २००५ पासून नाकाबंदी केलेल्या किनारपट्टीच्या प्रदेशाला भेट देणारे ते पहिले इस्रायली पंतप्रधान बनले. नेतन्याहू यांनी रविवारी गाझामध्ये तेथे तैनात असलेल्या इस्रायली संरक्षण दलाच्या सैनिकांना भेट दिली.
५८ ओलिसांची सुटका
युद्धविरामानंतरच्या तीन दिवसांत गाझामधून किमान ५८ ओलिसांची सुटका करण्यात आली असून त्यात थायलंड, फिलिपाइन्स आणि रशियाच्या नागरिकांचा समावेश आहे. इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या ११७ पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची इस्रायली अधिका-यांनी सुटका केली आहे. युद्धबंदी वाढवण्याच्या योजनेला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे.