बीड : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप झाले. या प्रकरणामुळे मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. संतोष देशमुख यांची केस सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवत आहेत. या प्रकरणी आज बीडच्या कोर्टात सुनावणी झाली. वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
कारण वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करावी, असा अर्ज न्यायालयात करण्यात आल्याचे अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. वाल्मिक कराडच्या संपत्तीची माहिती सीबीआयकडून घेतली जात आहे. वाल्मिक कराडच्या नावे मोठी गडगंज संपत्ती असल्याचे सांगितले जाते. पुण्यातील महागड्या सोसायटीत देखील त्याचा फ्लॅट आहे.
त्यातच कराडची संपत्ती जप्त करा, असा अर्ज कोर्टात दाखल झाल्याने कराडच्या अडचणीत वाढ झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पुरावा नाही, मला दोषमुक्त करा : कराड
दुसरीकडे माझ्या विरोधात पुरावा नाही. मला दोषमुक्त करा, अशी याचिका वाल्मिक कराडने कोर्टात दाखल केली. संतोष देशमुख यांचा खून आणि खंडणी प्रकरणात संबंध नाही, असेही कराडने आपल्या अर्जात म्हटले आहे.