28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत अजित पवारांना बाजुला करणार?

महायुतीत अजित पवारांना बाजुला करणार?

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा दावा अजित पवार नाराज असल्याची चर्चा

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आली. सरकारमधील अनेक मंत्री अर्थखात्याच्या विरोधानंतरही कॅबिनेट बैठकीच्यापूर्वी शेवटच्या क्षणाला महत्त्वाच्या योजनांचे प्रस्ताव मांडत असल्यामुळे अजित पवार नाखूश आहेत. त्यामुळेच अजित पवार हे गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अवघ्या १० मिनिटांत निघून गेल्याचे सांगितले जात आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महायुतीच्या सरकारमधील कॅबिनेट बैठकीतील वाद रोजचेच झाले आहेत. हा वाद जनतेच्या हितासाठी नाही, तर स्वत:च्या हितासाठी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी हा वाद सुरू आहे. तिजोरित पैसा नसताना ८६-८६ निर्णय घेतले जातात. यांना कोणाची चिंता आहे. अजित पवार यांना पूर्णपणे बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा मोठा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. अजित पवार अनेकवेळा वित्त खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी त्या विभागात शिस्त पाळण्याचे काम केलंय. पण, अलिकडे शिस्त बिघडवून काम सुरुय, आपल्या तिजोरीत पैसे किती आहेत आणि खर्च किती करावा याचे ताळमाळ नाही. पैसे नसताना जीआर काढले गेले, सगळे पाहता महाराष्ट्र कोणत्या दिशेने जात आहे हे दिसते आहे, हे राज्याला कंगाल करुन सोडतील. जाता जाता जेवढे मिळेल तेवढे कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळेच अजितदादांनी काढता पाय घेतला असावा असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचे प्रस्ताव आणले
अजित पवार निघून गेल्यानंतर अडीच तास सुरू असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेवटपर्यंत उपस्थित होते. सूत्रांनुसार, अजित पवार प्रचंड नाराज असल्याचे बोलले जाते, शेवटच्या क्षणी मंत्रिमंडळासमोर राज्यातील कारभार आणि महत्त्वाचे आर्थिक निर्णयांचे प्रस्ताव आणले गेले. त्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन होत नाही. बैठकीला काही वेळ उरला असताना आपल्यासमोर प्रस्ताव ठेवले जातात यावरून ते नाराज असण्याची शक्यता आहे.

पवार तडकाफडकी निघून गेले
गुरुवारी मंत्रिमंडळातून अजित पवार निघून गेल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अजित पवार बैठकीतून निघून गेले त्यामुळे ते नाराज आहेत का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, मी रायगडला होतो, कॅबिनेटमध्ये काय झाले याची कल्पना नाही. परंतु महायुतीत कुठलाही वाद नाही. जर कॅबिनेटमधून कुणी लवकर निघून गेले असेल तर त्याचा वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR