नवी दिल्ली : वृत्तसंस्था
म्यानमार सीमा अधिक सुरक्षित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. म्यानमारच्या सीमेवर आता कुंपण लावण्यात येणार आहे. म्हणजेच म्यानमार सीमेवर बांगलादेशच्या सीमेप्रमाणे तारेचे कुंपण घालण्यात येणार आहे. त्याशिवाय ये-जा ही परवानगीशिवाय होणार नाही, असे अमित शाह यांनी सांगितले. म्यानमारचे ६०० सैनिकांनी आणि लोकांनी मिझोराममध्ये घुसखोरी केली, यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलत होते.
मागील काही दिवसांपासून भारत आणि म्यानमार यांच्यातील सीमावाद उफाळला होता. सीमारेषावर तणावाचे वातावरण होते. म्यानमारमधून घूसखोरी केली जात असल्याचे अनेकदा समोर आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मोठी घोषणा केली. म्यानमार सीमेवरील मोफत ये जा यापुढे बंद करण्यात येणार आहे. त्याशिवाय सीमेवर तारेचे कुंपण घातले जाणार आहे. बांगलादेश सीमाप्रमाणेच आता म्यानमारचीही सीमा अधिक सुरक्षित करण्यात येणार आहे. लवकरच केंद्र सरकार याबाबत अंमलबजावणी करेल, असे अमित शाह यांनी सांगितले.
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या दौ-यावर होते. यावेळी त्यांनी भारत आणि म्यानमार सीमाबाबत मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, भारत आणि म्यानमार बॉर्डर ही सीमा याआधी सर्वांसाठी खुली होती, पण यापुढे त्याला फेन्सिंग केले जाणार आहे. घुसखोरी आणि म्यानमारमधून पळून जाणा-या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सरकार दोन्ही देशांमधील मुक्त संचारही बंद करणार आहे.