चेन्नई : चेन्नईमध्ये एका धक्कादायक घटनेत महिलेवर लघवी केल्याच्या आरोपानंतर जमावाने केलेल्या मारहाणीत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी पोलिस सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव कलाईसेलवन असे आहे. ही घटना बुधवारी (११ मार्च) घडली. त्या दिवशी कलाईसेलवन हा दारूच्या नशेत रस्त्यावरून जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच वेळी एक महिला तिच्या मित्रासोबत ऑटोरिक्षातून प्रवास करत होती. या दरम्यान कलाईसेलवनने त्या महिलेवर लघवी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वादानंतर मारहाण
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महिलेने आणि तिच्या मित्राने कलाईसेलवनला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असताना आसपासच्या लोकांचे लक्ष त्या ठिकाणी गेले आणि काही वेळातच मोठी गर्दी जमा झाली. परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत गेली आणि जमावातील काही लोकांनी कलाईसेलवनवर हल्ला करण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांनी सांगितले.
