27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिला ताटकळल्या

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी महिला ताटकळल्या

बँकेबाहेर रात्रभर मुक्काम

नंदुरबार : प्रतिनिधी
राज्यात महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला. सरकारने मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना सुरू केली खरी पण यातील काही अडचणीही समोर आल्या आहेत. अनेक महिलांना या योजनेसाठी ताटकळत रहावे लागत आहे.

दरम्यान, या योजनेचा आतापर्यंत अनेक महिलांनी लाभ घेतला. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. परंतु काही महिलांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही कारण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे, मोठ्या रांगाही लागत आहेत. त्यातच नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणा-या महिला आणि नातेवाईकांना रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम करावा लागला आहे. शहादा शहरातील बँकेच्या बाहेर ही विदारक स्थिती आहे.

ग्रामीण भागातून अनेक नागरिक शहरातील बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी चकरा मारताना दिसतात. मात्र तरीही काम होत नसल्याने आणि दररोज येण्या-जाण्यासाठी होणारा खर्च परवडत नसल्याने आदिवासी महिलांना शहादा शहरातील बँकेच्या बाहेरच मुक्काम करावा लागला. घरून भाजी-भाकरी बांधून येणा-या आदिवासी महिला रात्रभर बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे .

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई-केवायसी करावे लागत आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाती उघडली आहेत, मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहेत. पण बँकांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने अनेक महिलांना रिकाम्या हातांनी परत जावे लागते. पण केवायसीसाठी रोजच्या रोज फे-या मारणे, परत येणे-जाणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. त्यामुळे अनेक महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुक्काम करण्याचा पर्याय निवडला आहे. केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR