पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या मेसमधील जेवणात आळी , झुरळे, पाल्टिक, केस इत्यादी गोष्टी निघणे हे आता नवीन राहिले नाही. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. विद्यार्थी खात असलेल्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस आढळून आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकांचा समावेश असलेली उपाहारगृह व भोजनगृह दक्षता समिती तसेच विद्यार्थ्यांचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती अशा दोन समित्या गठित केल्या आहेत. या समितीमधील विद्यार्थी प्रतिनिधी अधूनमधून भोजनगृहास भेटी देतात. आता पुन्हा एकदा मुलींच्या मेसमध्ये एका विद्यार्थिनीच्या पोह्यांमध्ये अळी तर उपीटमध्ये केस दिसून आला आहे. विद्यापीठ प्रशासनाला थोडी जरी जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी आता तरी या सर्व प्रकारावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला खडसावले आहे.
सर्व विद्यार्थी संघटना याविरोधात आवाज उठवतात. संबंधित मेस चालक बदलला जातो. नवीन माणूस येतो. परंतु जेवणाचा दर्जा मात्र सुधरत नाही. आमची विद्यापीठ प्रशासनास नम्र विनंती आहे की त्यांनी आता यावर कायमस्वरूपी मार्ग काढावा. अन्यथा असे निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन विद्यार्थ्यांच्या जीवास काही धोका निर्माण झाला तर त्यास सर्वस्वी विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, असेही विद्यार्थी म्हणाले.