22.4 C
Latur
Monday, January 13, 2025
Homeमहाराष्ट्रयुवा संघर्ष यात्रेचा विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न

युवा संघर्ष यात्रेचा विधानभवनात घुसण्याचा प्रयत्न

नागपूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे आमदार व युवा नेते रोहित पवार यांनी आपली युवा संघर्ष यात्रा घेऊन विधान भवनात येण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. ब-याच झटापटीनंतर पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तत्पूर्वी संघर्ष यात्रेच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते दिग्विजयसिंग, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप आज नागपूरमध्ये झाला. विधान भवनाजवळच्या झिरो माईल येथे पोलिसांनी ही संघर्ष यात्रा रोखली. त्यानंतर तेथे सभा झाली. या सभेत शरद पवार, दिग्विजयसिंग, संजय राऊत यांची भाषणे झाली. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी येण्याऐवजी भाजपचे शहराध्यक्ष आले. त्यामुळे आमदार रोहित पवार आक्रमक झाले. युवा संघर्ष यात्रेचा रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेट तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली. या नंतर रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांसह तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.

तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी, आम्ही शेतक-यांचे, बेरोजगारांचे प्रश्न मांडण्यासाठी संघर्ष यात्रा काढली होती; पण आमचे निवेदन घ्यायलाही सरकारला वेळ नाही. सरकारचा प्रतिनिधी पाठवण्याऐवजी भाजपच्या शहर अध्यक्षांना पाठवण्यात आले होते. यात्रा संपल्यानंतरही १५ मिनिटे वाट पाहिली. मात्र कुणीही आले नाही. त्यामुळे यात्रा विधान भवनाकडे जाण्याचा निर्णय घेतल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

युवाशक्तीची ताकद सरकारला समजेल
तत्पूर्वी जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. सरकार ऐकत नसेल तर युवाशक्ती काय करू शकते, हे सरकारलादेखील समजेल, असा इशारा त्यांनी दिला. मीदेखील एकेकाळी जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी काढली होती. यात्रा इतिहास घडवत असतात. सामुदायिक शक्तीपुढे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झुकावे लागले होते, अशी आठवण पवार यांनी सांगितली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR