रांची : भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच केंद्र सरकार झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्यावर मेहेरबान झाले आहे. केंद्र सरकारने चंपाई सोरेन यांच्या सुरक्षेत वाढ केली असून, त्यांना आता झेड प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली असून, आता चंपाई सोरेन यांच्या सुरक्षेसाठी ३३ सैनिक तैनात करण्यात येणार आहेत. चंपाई सोरेन सध्या झारखंड सरकारमध्ये उच्च शिक्षणमंत्री असून, २८ ऑगस्टला ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री चंपाई सोरेन यांनी अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीत भावी रणनीतीबाबत चर्चा झाली. यावेळी आसामचे मुख्यमंत्री आणि झारखंड भाजपचे निवडणूक सहप्रभारी हिमंता बिस्वा सरमा उपस्थित होते. मीटिंगनंतर हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करून ही माहिती शेअर केली. चंपाई सोरेन ३० ऑगस्टला रांचीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
चंपाई सोरेन यांच्यामुळे झारखंडमध्ये भाजपला होणार फायदा
दरम्यान, माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांच्या भाजप प्रवेशामुळे झारखंडमधील कोल्हान भागात भाजपला चांगला फायदा होणार असून, या भागात भाजप आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे भाजपच्या निवडणूक प्रचाराला अधिक गती मिळणार आहे. चंपाई संताली आदिवासी समाजाचे मोठे नेते आहेत. आदिवासींची मते मिळविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या स्टार प्रचारकची भूमिका पार पाडणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.