22 C
Latur
Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रअजितदादांच्या निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक २ दिवस पुढे ढकलली

अजितदादांच्या निधनामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक २ दिवस पुढे ढकलली

५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान ९ फेब्रुवारीला मतमोजणी

मुंबई : प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्याने १२ जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांची निवडणूक २ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी ऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणा-या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मतदान, मतमोजणी शिल्लक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान होईल. जाहीर प्रचार ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता समाप्त होईल तर ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रसिद्ध केली जातील, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR