मुंबई : वृत्तसंस्था
अनिल अंबानीच्या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी घसरण झाली. कंपनीचे बहुतांश शेअर्सना लोअर सर्किट लागले. रिलायन्स पॉवरचा शेअर आज ५ टक्क्यांनी घसरला आणि ५६.७२ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. याशिवाय रिलायन्स इन्फ्राच्या शेअरनेही ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि इंट्राडे नीचांकी स्तर ३४२.०५ रुपयांवर घसरला. रिलायन्स होम फायनान्सच्या शेअरने ५ टक्क्यांची नीचांकी पातळी गाठली आणि हा शेअर ४.४९ रुपयांपर्यंत घसरला.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १३ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने अनिल अंबानी आणि त्यांची कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन यांना घोटाळेबाज जाहीर केले. याप्रकरणी आता बँक सीबीआयकडे औपचारिक तक्रार दाखल करणार आहे. बँकेने कंपनीला २,२२७ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज दिले आहे. मात्र, या कर्जाची मुद्दल आणि व्याज २६ ऑगस्ट २०१६ पासून थकीत आहे.
अंबानी यांच्या उद्योग समूहाने येस बँकेकडून २०१७ ते २०१९ या कालावधीत तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, या कर्जासाठी लाचखोरी झाली, तसेच कर्जाची रक्कम काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून वळवत अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे.