मुंबई : प्रतिनिधी
राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात २२ वाघांचा मृत्यू झाला अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२४ या दरम्यान राज्यात विविध कारणांनी १०७ वाघांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
यापैकी नैैसर्गिक कारणामुळे १३, विजेच्या धक्क्यामुळे ४, रस्ता, रेल्वे व विहीर अपघातात चार आणि अज्ञात कारणामुळे १ वाघ दगावला, असे नाईक यांनी सांगितले. याच काळात ४० बिबट्यांचाही मृत्यू झाला. त्यात नैसर्गिक कारणाने ८, रस्ता, रेल्वे आणि विहीर अपघातात २०, शिकार ३, अज्ञात कारणामुळे ९ बिबटे दगावले.
याच कालावधीत नैसर्गिक कारणांमुळे २३, विजेच्या धक्क्यामुळे ४, शिकार ४, रस्ता अपघात, कुर्त्यांच्या हल्ल्यात आणि विहीर अपघातात २४ आणि अज्ञात कारणामुळे ६ अशा एकूण ६१ अन्य वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याची माहितीही वनमंत्री गणेश नाईक सभागृहात दिली. जानेवारी ते एप्रिल २०२५ या काळात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात २१ व्यक्तींचा मृत्यू झाला. २०२२ ते २०२४ दरम्यान राज्यात ७०७ वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला.