लातूर : प्रतिनिधी
भारतामध्ये १९१९ पासून दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. यापूर्वी २०१९ साली २० वी पशुगणना झाली होती. आता २१ वी पशुगणना सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून गणगननेत पाळीव प्राणी, कुक्कुटपालन व भटक्या प्राण्यांची संख्या मोजण्यात येईल. प्राण्यांचे वय, लिंग, जात, प्रजाती, आणि मालकी हक्क यासंदर्भातील माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानुसार प्राण्यांच्या संदर्भाने नियोजन करण्यास मदत होणार आहे.
पशुपालन हे भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. लाखो कुटुंबांना उत्पन्न व पोषण सुरक्षा देणा-या या क्षेत्राचे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान आहे. दूध, अंडी, मांस, लोकर आदींच्या उत्पादनामुळे पोषण सुरक्षेसोबत ग्रामीण उपजीविकेलाही चालना मिळते. विशेषत: ग्रामीण भागात पशुपालन हा कृषीपूरक व भूमिहीन कुटुंबांसाठी स्थिर उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत आहे.
पशुधन लोकसंख्येबाबत सर्वसमावेशक माहिती गोळा करण्याच्या बरोबरच रोग नियंत्रण, जाती सुधारणा आणि पशुधन क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेणे. पशुधन क्षेत्रातील कल, नमुने व आव्हाने ओळखणे. संसाधनांचे योग्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. २१ वी पशुगणना पशुधन क्षेत्राचा विकास व सुधारणा घडवण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. या माहितीचा वापर शासनाला धोरणे आखण्यासाठी व शेतक-यांच्या क्षेत्राच्या प्रगतीसाठी मदत करण्यासाठी होणार आहे.