प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने आपली नगण्य ताकद असलेल्या त्या राज्यात स्वत:चे अस्तित्व निर्माण करायचे, हळूहळू स्वत:साठी पूरक वातावरण तयार करून आपल्या पक्षाची ताकद वाढवत जायचे आणि नंतर ज्यांच्या सहकार्याने, मदतीने आपण उभे राहिलो त्या प्रादेशिक पक्षालाच आव्हान द्यायचे ही भाजपच्या अलीकडल्या काळातील राजकारणाची रीत बनली आहे. शिवसेना, अकाली दल यांसारख्या भाजपच्या कित्येक वर्षांपासून मित्रपक्ष राहिलेल्या प्रादेशिक पक्षांसह विविध राज्यांतील अनेक छोट्या-मोठ्या पक्षांना भाजपच्या या ‘गरज सरो वैद्य मरो’ या राजकारणाचा पुरेपूर अनुभव आलेला आहेच! अनेक प्रादेशिक पक्ष भाजपच्या या राजकारणाने राज्यातील आपली राजकीय ताकद व मतपेढी गमावून बसले तर काही पक्षांचे तर अस्तित्वच धोक्यात आले आहे. मात्र जगातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून मिरवणा-या भाजपची विस्ताराची भूक मात्र संपताना दिसत नाही. भाजपच्या याच राजकारणाच्या बळींच्या यादीत आता बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांचा समावेश होताना दिसतो आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसोबत चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकाही पार पडल्या! त्यात भाजपला लोकसभा निवडणुकीत स्वबळावर सरकार स्थापन करता येईल, असे बहुमत न मिळाल्याने मोदी पर्वातील हे मोदींचे तिसरे सरकार हे मोदींचे वा भाजपाचे नव्हे तर रालोआचे सरकार असणार आहे. मात्र त्याच वेळी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने दोन राज्यांत स्वबळावर तर एका राज्यात मित्र पक्षासह सत्ता प्राप्त केली आहे. ज्या दोन राज्यांत भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली त्यात अरुणाचल प्रदेश व ओडिशा या दोन राज्यांचा समावेश होतो. अरुणाचलमध्ये भाजपने सत्ता कायम ठेवण्याची कामगिरी केली मात्र ओडिशातील भाजपचा विजय मात्र लक्षणीय आहे. ओडिशात मागच्या अडीच दशकांपासून ‘अजेय’ मानल्या जाणा-या मुख्यमंत्री नवीन पटनायक व त्यांच्या बिजू जनता दलाला पूर्णपणे पराभूत करून भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केले व पूर्व भारतात आपला झेंडा फडकाविला आहे.
वास्तविक या निवडणुकीपूर्वी भाजप व बिजू जनता दल यांच्यात युतीची बोलणी सुरू होती. तब्बल १७ दिवसांच्या जागा वाटपाच्या चर्चेनंतर ही बोलणी फिसकटली आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १४७ सदस्यीय विधानसभेत ७८ जागा तर लोकसभेच्या २१ पैकी २० जागा जिंकून भाजपने या राज्यात निर्भेळ यश संपादन केले. शेजारच्या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपचा विजय रथ रोखलेला असताना मागच्या २४ वर्षांपासून ओडिशात ‘अजेय’ राहिलेल्या नवीन पटनायक यांना मात्र दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्या मागे पटनायक यांनी सातत्याने भाजपशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहकार्याची घेतलेली भूमिकाच शेवटी त्यांच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळते. १९९७ ते २००८ या काळात बिजू जनता दल व भाजप हे ओडिशात मित्र पक्ष होते. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्या काळात पटनायक सरकारमध्ये भाजपच्या वतीने मंत्री होत्या. ओडिशाच्या मागास भागात धर्मांतर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची ओरड सुरू झाल्यावर ते रोखण्यासाठी म्हणून बजरंग दल सक्रिय झाले.
याच दरम्यान ऑस्ट्रेलियन धर्मप्रचारक ग्रॅहम स्टेन्स व त्यांच्या दोन मुलांची जानेवारी १९९९ मध्ये जिवंत जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. तेव्हापासून बजरंग दल, भाजप व रा. स्व. संघाने ओडिशात हातपाय पसरण्यास सुरुवात केली. २००८ मध्ये कंधमहल जिल्ह्यात हिंदू-ख्रिश्चन असा हिंसक संघर्ष झाला होता व त्यात ३० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला होता, हजारो लोक विस्थापित झाले होते. यानंतर नवीन पटनायक यांनी भाजपची ‘थेट साथ’ सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र संसदेत व संसदेबाहेरही सातत्याने भाजपला अनुकूल व सहकार्याचीच भूमिका घेतली. संसदेत अनेक वेळा संख्याबळाने अडचणीत सापडलेल्या भाजपला पटनायक यांनी सहकार्य करून अडचणीतून बाहेर काढले. अगदी अलीकडे राज्यसभेच्या ३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपकडे पुरेशी मते नसतानाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवडून आणण्यासाठी पटनायक यांनी भाजपला मदत केली होती. मात्र हीच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भाजपला सहकार्य करण्याची भूमिका आता पटनायक व त्यांच्या पक्षाच्या मुळावर उठली आहे.
भाजपने या वेळच्या निवडणुकीत बरोबर संधी साधून नवीन पटनायक व बिजू जनता दलाच्या मुळावर घाव घातला. विशेष म्हणजे हा घाव घालताना राष्ट्रीय पक्ष असणा-या भाजपने चक्क प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पुरता तापवून प्रादेशिक पक्ष असणा-या बिजू जनता दलास ‘चेकमेट’ केले! अलीकडे ७७ वर्षीय नवीन पटनायक यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे हिंडण्या-फिरण्यावर मर्यादा पडल्या होत्या. त्यांचे सचिव व सनदी अधिकारी व्ही. के. पंडियन हे प्रशासन व राजकारण अशा दुहेरी वर्तुळात महत्त्वाची भूमिका बजावत होते. स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून पंडियन यांनी अधिकृतपणे बिजू जनता दलात प्रवेश केल्यावर पटनायक यांचे पक्षातील उत्तराधिकारी पंडियनच आहेत ही भावना पक्षात व जनतेतही दृढ होऊ लागली होती. पटनायक अविवाहित असल्याने व पंडियन यांचे पक्षातील स्थान बळकट होत असल्याने हा समज दिवसेंदिवस घट्ट होत चालला होता. पंडियन हे मूळचे तामिळी ! यामुळे ओडिशाची सूत्रे तामिळीच्या हाती देणार का? असा प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा भाजपने चाणाक्षपणे उचलून धरला. मोदीपासून सर्वच भाजप नेत्यांनी प्रचारात हा मुद्दा प्रचंड तापविला. एवढेच नव्हे तर मोदी यांनी पटनायक यांच्या प्रकृती स्वास्थ्याबद्दल शंकाही उपस्थित केल्या.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात ही निवडणूक राज्यात याच मुद्यावर केंद्रित झाली तेव्हा पटनायक यांना आपली प्रकृती उत्तम असल्याचा व पंडियन आपले पक्षातले उत्तराधिकारी नसल्याचा खुलासा करावा लागला. मात्र तोवर खूप उशीर झाला होता व भाजपने आपला कार्यभाग साधला होता. त्यातून स्वत: पटनायक यांनाही निवडणुकीत पराभव चाखावा लागला व बिजू जनता दलाची २४ वर्षांची राज्यातील ‘अजेय’ सद्दी संपुष्टात आली. भाजपने या राज्यात निर्विवाद यश प्राप्त केल्याने पटनायक व त्यांच्या बिजू जनता दलासमोर आता अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित झाला आहे. थोडक्यात भाजपने वेळ येताच ज्याप्रमाणे शिवसेना, अकाली दल, भारत राष्ट्र समिती, आसाम गण परिषद, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अण्णा द्रमुक आदी प्रादेशिक पक्षांना जागा दाखवून दिली. त्याचप्रमाणे आता पटनायक व त्यांच्या बिजू जनता दलालाही त्यांची जागा दाखवून देण्यास व ‘अब की बारी..पटनायकांची बारी’! हे सिध्द करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक विजयाच्या दिल्लीतील जल्लोषात मोदी यांनी भाषणाची सुरुवात ‘जय जगन्नाथ’ अशी करणे हे त्याचेच द्योतक नाही काय?