19 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रआपत्तीग्रस्त शेतक-यांना सरसकट मदत करा !

आपत्तीग्रस्त शेतक-यांना सरसकट मदत करा !

मुंबई : (प्रतिनिधी) एकीकडे शेतक-यांना अन्नदाता म्हणून गौरवायचे आणि दुसरीकडे नुसताच शाब्दिक छल करून शेतक-यांच्या हातातोंडाशी येणारा घास हिरावून न्यायचा. हेच ह्या घटनाबा सरकारचे काम आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शेतक-यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनाम्याचा खेळ थांबवा आणि सरसकट मदत द्या अशी मागणी केली. सरकारने सर्वकाही विकायला काढले आहे. आता तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका. बळीराजा बांधवांनो एकत्र या आणि सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

ंिहगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतक-यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. या सरकारच्या काळातील कोणतीही योजना असो, शेतक-यांच्या पदरी आश्वासनांच्या खैरातीशिवाय काहीच पडत नाही, अशी खंत व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

कर्जमाफीची घोषणा होते. पंचनाम्याची घोषणा होते. कोट्यवधींची तरतूद केली जाते. नुकसानग्रस्त शेतक-यांसाठी भरपाई मंजूर होते. पुन्हा कोट्यवधींची तरतूद होते. अर्ज भरून घेण्याचे सोपस्कार पार पडतात. छाननी होते. काही पात्र तर काही अपात्र ठरतात. पुन्हा पडताळणी होते, हा खेळ सुरूच राहतो. तोपर्यंत शेतक-याचा जीव टांगणीला लागतो. पण शेवटी पदरी निराशाच येते. हेच काहीसे पीक विमा योजनेच्या बाबतीत आहे. या योजनेचा नुसता गाजावाजा, पण प्रत्यक्षात खत्यात एक रुपया नाही. ही बळीराजाची थट्टाच सुरु आहे, अशी टीका ठाकरे करत मग, शेतक-यांच्या पिकविम्यासाठी सरकारने भरलेले कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले? असा सवाल त्यांनी केला.

यावेळी ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिका-यांना शेतक-यांच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा आदेश दिला. मी सर्व जिल्हाध्यक्ष आणि पदाधिका-यांना सांगतोय की त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे न्यावेत. पंचनामे आधीचे आणि आत्ताचे कधी केले ते पाहा. हा घोटाळा आहे का? याची मला शंका येत आहे. सरकारने विमा कंपन्यांना पैसे दिले आहे. हा पैसा कोणाच्या खिशात गेलाय? शेतक-यांना पीक विम्यापोटी किती पैसे मिळाले याची माहिती घ्या,ठाकरे यांनी सांगितले.

नालायक हा शब्द त्यांना बरोबर लागला आहे. दुस-याकडे धुणीभांडी करायला जाणारे राज्य कारभारासाठी नालायक आहेत. आता यावर त्यांना काय करायचे ते त्यांनी त्यांनी करावे, असा टोला ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला. शेतक-यांना सरसकट नुकसान भरपाई द्याकिंवा पुन्हा कर्जमुक्ती द्या. सर्व शेतक-यांना कर्जमुक्ती द्यावी ही आमची आग्रहाची मागणी आहे, असेही ठाकरे म्हणाले.दरम्यान, धनंजय मुंडे यांनी कुठल्या तरी एका घरात बसावे आणि सांगावे कि हे माझे घर आहे आणि तिकडे बसून त्यांनी कारभार करावा, असा टोला ठाकरे यांनी यावेळी मुंडे यांना लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR