मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) आमदार सुनील शेळके यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांनी फडणवीसांकडे मागणी केली आहे की त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर कारवाई करून महाराष्ट्राची लूटमार थांबवावी. या आरोपांवर सुनील शेळके म्हणाले, संजय राऊत यांनी यासंबंधीचे पुरावे दिले तर मी त्यावर खुलासा करेन.
संजय राऊत म्हणाले, हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. सरकारला समर्थन देणारे पक्ष, त्या पक्षांचे आमदार-खासदार महाराष्ट्राची लूटमार करत आहेत आणि फडणवीसांचे त्याकडे लक्ष नाही. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी लुटली आहे. एमआयडीसीच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे खाण उद्योग सुरू करून त्यांनी सरकारची हजारो कोटी रुपयांची रॉयल्टी बुडवली आहे. त्याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर तपशील पाठवला आहे. त्यासह पुरावे देखील जोडले आहेत.
मी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री व आमदारांची भ्रष्टाचाराची २१ प्रकरणं पुराव्यासहित पाठवली आहेत. मात्र फडणवीस यांनी आजपर्यंत त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा मी त्यावर कारवाई करेन असे सांगितले देखील नाही. त्या पत्रांची दखलही घेतलेली नाही.
मी खुलासा करणार नाही : सुनील शेळके
कोणत्याही प्रकारचे पुरावे नसताना संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडे माहिती असेल, काही पुरावे असतील किंवा मला यासंबंधीच्या शासकीय नोटिसा आल्या असतील, माझी चौकशी चालू असेल तर त्याचे पुरावे सादर करावेत. जोवर ते पुरावे सादर करणार नाहीत तोवर मी कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. कुठलाही खुलासा करणार नाही.