छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
आयफोनचे हप्ते बाऊन्स झाल्याने त्यासाठी पैसे पाहिजेत, या मागणीसाठी हट्ट करून आई- वडिलांना वेठीस धरून आत्महत्या करण्यासाठी युवक तिसगाव शिवारातील खवल्या डोंगरावर गेला. तिथं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आई-वडील विनवणी करत होते. त्यात वडिलांनी त्याला अलीकडे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाने हात मागे घेण्यासाठी तो ओढला. तोल जाऊन दोघेही डोंगरावरून खाली पडले आणि काही सेकंदात त्यांचा मृत्यू झाला. आईनं देखील दहा सेकंदात तिथूनच उडी घेऊन आत्महत्या केली. एका आयफोनसाठी तीन जणांचे प्राण गेले. एक संपूर्ण कुटुंब काही सेकंदात संपले. कुणाल छानगुडे (वय १९) असे सदरील मुलाचे नाव असून, मुरलीधर (वय – ४८) आणि संगीता छानबुडे (वय – ४२) अशी मृतांची नावं आहेत.
तिसगाव येथील खवल्या डोंगर हा जणू आत्महत्या करण्याचं केंद्र झाला आहे, शुक्रवारी असाच एक प्रकार परिसरात घडला. कुणाल छानगुडे नावाचा युवक घरातून वाद घालून या डोंगरावर आला. तेथील गावक-यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
आयफोनचा हप्ता बाऊन्स झाला
मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे वडील मुरलीधर हे ट्रक चालक आहेत. दोन दिवसांपूर्वी ते घरी परत आले होते. त्यावेळी कुणाल याने ‘आयफोनचा हप्ता बाऊन्स झाला’ असे म्हणत वाद घातला. वडील चालक असल्याने आर्थिक गणित जुळले नसावे. मात्र, वडील त्याला समजून सांगत असताना कुणाल ऐकत नव्हता. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच कुणाल या खवल्या डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळी दहा वाजता तो तिथे आल्यावर ग्रामस्थांनी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो बाजूला यावा याकरिता प्रयत्न केले. मात्र, वडील तिथे आले आणि त्यांनी त्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन दोघे खाली पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना पाहून आई संगीताने देखील डोंगरावरून उडी घेतली आणि आपले प्राण दिले.
कुणाल हा हुशार विद्यार्थी होता. त्याला दहावीत ९२ टक्के गुण मिळाले होते. तो सध्या नीटची तयारी करत होता. अभ्यासात हुशार असला तरी आजकालच्या झगमगाट असलेल्या जगात त्याची समज कमी पडत होती. घरची परिस्थिती इतकी चांगली नाही. त्याने मागील वर्षी असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याला आयफोन हवा होता म्हणून तो याच खवल्या डोंगरावर आला होता. आत्महत्या करतो असे सांगत त्याने आई-वडिलांना वेठीस धरून आयफोन मिळवला होता. मात्र, यावेळी त्याच आयफोनचे हप्ते थकल्याने पुन्हा त्याने पैसे मिळवण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डोंगरावर चढल्यावर त्याने आई-वडिलांना फोन करून तशी माहिती दिली.
तू मला सोडून जाऊ नको : आईची शेवटी हाक
आई-वडील तिथे पोहोचले. त्याच्या आईने भरपूर विनवणी करून त्याला आत्महत्या करू नको, असे सांगितले. इतकेच नाही तर ‘वेळ पडली तर वडिलांना सोडेल मात्र तू मला सोडून जाऊ नको’ अशी विनवणी देखील केली. त्यातच हा सर्व प्रकार घडला, अशी माहिती पोलिस निरीक्षक रामेश्वर पाटील यांनी दिली.
मोठ्या भावाचा देखील झाला मृत्यू
कुणाल छानगुडे हा १९ वर्षीय युवक होता. त्याचे वडील मुरलीधर हे ट्रक चालक तर आई गृहिणी होती. त्याला एक मोठा भाऊ देखील होता. मात्र, आजारपणात त्याचेही काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबीय प्रचंड तणावात जगत होते. वडील ट्रक चालक असल्याने ते सहसा प्रवासात शहराच्या बाहेरच असायचे. त्यात ते दोन दिवसांपूर्वी घरी आल्यावर पैशासाठी कुणालने हट्ट धरला. त्यांच्यात भांडण झालं आणि त्यातूनच सदरील प्रकार घडला.
















